साईंच्या शिर्डीत येताना पाळावे लागणार ‘हे’ नियम
शिर्डी: आज राज्यभरात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत असून, कदाचित दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांना कोरोनाने पुन्हा विळखा घातला आहे. त्याठिकाणी लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.मागील काही आठवड्यांपासून परिस्थिती बिघडत असल्या कारणाने आता स्थानिक पातळीवर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात यावा असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या परिस्थिती मुळे शिर्डी मध्ये येत असताना भाविकांना आता काही नियम आणि अटी पाळाव्या लागणार आहेत.
या पार्श्वभुमीवर शिर्डीत येणाऱ्यांसाठी विविध नियमांचे पालन करणे बंधनकाराक केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तिर्थस्थळ असून या ठिकाणी रोज देशभरातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची अधिक वर्दळ असते. यामुळे शिर्डी मध्ये कोरोना पसरण्याचा धोका जास्त आहे. या संदर्भात नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व नगरपंचायत पदाधिकारी यांनी शहरातून जनजागृती मोहीम काढून भाविकांसह नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले .
नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी सांगितले की, बैठकीत सांगितलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंबलबजावणी केली जाणार आहे. मास्कचा वापर नागरिकांनी करणे अनिवार्य राहणार आहे. रस्त्यावर थुकणाऱ्यांना कारवाई सामोरे जावे लागेल. दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून नगरपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. नागरिकांची ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंग तपासणी केली जाणार आहे. अँटिजन चाचणीत वाढ केली जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे. मंगल कार्यालयात पन्नासपेक्षा अधिक लोकांना परवानगी दिली जाणार नाही. गर्दी करता येणार नाही आदी नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले .