Saturday, October 1, 2022
HomeZP ते मंत्रालय२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, 'काय करतो ? विधानसभा लढतोस का...

२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो ? विधानसभा लढतोस का ?’

काल शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने खोतकरांनी एकनाथ शिंदेंना पाठींबा दिल्याचे जाहीर केले. मात्र, खोतकरांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले.

संजय राऊत यांच्याकडून खोतकर आमच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर खोतकर-दानवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र दिसत आहे. आज सकाळी दानवे यांच्या घरी खोतकर ब्रेकफास्टला गेल्याची बातमी समोर आली. त्यामुळे शिंदे-फडणवीसांनी घडविलेली खोतकर-दानवे यांची समेट यशस्वी झाल्याचे दिसते.

पण खोतकर शिंदे गटात जाऊ शकतात, म्हणून ते चर्चेत आहेत, असे नाही… २५ व्या वर्षी आमदार होण्यापासून ते आलटून पालटून निवडून येण्यापर्यंत त्यांचा प्रवास रंजक आहे.

बाळासाहेबांच्या संपर्कात खोतकर कसे आले ?

जालन्यात शिक्षण घेत असतानाच अर्जुन खोतकर हे विद्यार्थी चळवळीत सक्रीय होते. तिथे त्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास झाला. विद्यार्थी संसदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. याचवेळी त्यांनी विविध वर्तमानपत्रात, मार्मिक मासिकात शिवसेनेच्या संदर्भात वाचन केले.

पुढे १९८२-८३ मध्ये त्यांना बाळासाहेबांना मुंबईत भेटण्याची संधी मिळाली. त्यानंतर खोतकरांचे शिवसेनेप्रती आकर्षण अधिकच वाढू लागले. ते बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झाले..

मराठवाड्यात शिवसेना वाढत असताना …

याच काळात बाळासाहेब ठाकरे नावाचे वादळ महाराष्ट्रातील राजकारणात उलाथापाठ घडवून आणत होते. शिवसेनेचे मुंबईबाहेर विस्तारासाठी प्रयत्न सुरु होते.

त्यातच मराठवाड्यातील प्रस्थापितांच्या विरोधात असंतोष असलेल्या तरुणाईला बाळासाहेबांच्या रुपाने पर्याय दिसू लागला. शरद पवार पुन्हा कॉंग्रेसमध्ये गेल्याने त्यांच्या पाठीशी असणारा मराठवाड्यातील प्रस्थापितांच्या विरोधात असणारा तरुण वर्ग बाळासाहेबांकडे आकर्षित झाला.

८ मे १९८८ ला बाळासाहेबांनी तेव्हाच्या औरंगाबादमध्ये एक सभा घेतली आणि याच सभेनंतर मराठवाड्यात शिवसेनेने आपला पाया घातला. या सभेत बाळासाहेबांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा मांडल्याने शिवसेनेला अधिकच फायदा झाला.

त्यावेळी शिवसेनेचा बोलबाला केवळ मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांमध्ये चालायचा. मात्र, औरंगाबाद मध्ये बाळासाहेबांच्या सभा स्थळी जमलेला लाखोंचा जनसमुदाय पाहून बाळासाहेब देखील मी माझा रेकॉर्ड मोडला आहे, असे म्हणाले होते.

१९८८ साली औरंगाबाद महानगर पालिकेत शिवसनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. आणि इथेच ‘बाळासाहेब ठाकरे’ नावाचा फॅक्टर मराठवाड्यात चालू शकतो, याची अनुभूती आली.

बाळासाहेब जालन्यात जातात तेव्हा …

१९८८ मध्ये बाळासाहेब जालन्यात आले. त्यांनी जाहीर सभा घेतली. या सभेचे सूत्रसंचालन केले ते अर्जुन खोतकर या युवकाने.. बाळासाहेबांसमोर बोलण्याची खोतकरांना सुवर्ण संधी मिळाली. आणि संधीचे सोने झाले.

सूत्रसंचालन करीत असताना बाळासाहेबांनी खोतकरांना जवळ बोलावून घेतले. चांगला बोललास रे, असे म्हणत कौतुकाची थाप टाकली. लगेच काय करतो ? विधानसभा लढतोस का ? असा थेट सवाल केला.

त्यांनतर अर्जुन खोतकरांनी विद्यार्थी सेनेच्या कामास सुरवात केली. दोनच वर्षात १९९० मध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्यांना जालना मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.

१९९० च्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर सामान्य शिवसैनिकांना उमेदवाऱ्या मिळाल्या. शिवसेनेला कार्यकर्त्यांची गरज होती. अशावेळी ‘अर्जुन खोतकर’नावाच्या बाणाचा बाळासाहेबांनी आपल्या भात्यात समावेश करून घेतला.

२५ व्या वर्षी आमदार

विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या या तरुणाला बाळासाहेबांनी हेरले आणि निवडणुकीच्या रणांगणात उतरवले. खोतकरांनीही २७ हजार मतांच्या मताधिक्याने विजय मिळवत बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला.

ते आमदार झाले तेव्हा, केवळ २५ वर्षांचे होते. सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून खोतकरांच्या नावे रेकॉर्ड होता.

आमदार झाल्यानंतर खोतकर मातोश्रीवर आशीर्वाद घ्यायला गेले. त्यावेळी बाळासाहेब मासाहेबांना म्हणाले, आपल्याला टवटवीत आमदार मिळाला बघ. नाहीतर आपल्याला इतर पक्षांचे रांगडे आणि दणकट आमदार बघण्याची सवय लागलेली आहे.

आलटून पालटून निवडून येण्याची परंपरा

१९९५ मध्ये खोतकर दुसर्यांदा आमदार झाले. पुढे युती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. १९९७ ते १९९९ दरम्यान, त्यांच्यावर पाणीपुरवठा, पर्यटन, माहिती जनसंपर्क राज्यमंत्री व आणि तेव्हाच्या उस्मानाबादच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

मात्र, १९९९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने हॅटट्रिक हुकली. हा पराभव घडवला होता कैलास गोरंट्याल यांनी. गोरंट्याल हे खोतकरांचे पारंपारिक विरोधक मानले जातात. विद्यार्थी चळवळीपासून हे दोघे एकमेकांच्या विरोधात होते.

बघता-बघता २००४ ची निवडणूक लागली आणि खोतकर पुन्हा विजयी झाले. इथूनच खोतकर-गोरंट्याल यांच्या आलटून पालटून निवडून परंपरेला सुरुवात झाली.

पुढे २००९ ची निवडणूक लागली. यावेळीही खोतकरांना सलग विजय मिळविता आला नाही. याचे कारण त्यांनी आपला पारंपारिक मतदारसंघ सोडून घनसावंगी मतदारसंघातून निवडणूक लढवली. जिथे राष्ट्रवादीच्या राजेश टोपेंनी त्यांचा पराभव केला. पुढे २०१४ च्या निवडणुकीती विजय मिळवून खोतकर पुन्हा विधानसभेत पोहोचले.

२०१४ मध्ये पुन्हा आमदार झाल्यानंतर २०१६ मध्ये त्यांची फडणविसांच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली. त्यांनतर त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत रावसाहेब दानवे यांच्याविरोधात संघर्ष सुरु केला. मात्र, युती धर्मासाठी त्यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना माघार घ्यायला लावली..

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्हा काबीज करायला निघालेल्या खोतकरांचा पुढील सहाच महिन्यात गेम झाला. त्यांच्या पारंपारिक विरोधकांकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांचा १६ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

अधिक वाचा

लोकसभा निवडणुकीवेळी खोतकरांनी दानवेंना घाईला आणलं, नेमका वाद का सुरु झालेला ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments