‘या’ वादग्रस्त नाटकाला बाळासाहेबांनी केला होता विरोध…

घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित मराठी नाटक लिहिले. १६ डिसेंबर १९७२ मध्ये जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीराम कोतवाल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्र घाशीराममय झाला. या नाटकाचे नृत्य दिग्दर्शन कृष्णदेव मुळगुंद तर संगीत दिग्दर्शन भास्कर चंदावरकर यांनी केले होते. या नाटकात नाना फडणवीस याच्या चारित्र्यावर चिखलफेक केली आहे म्हणून तत्कालीन ब्राह्मणांनी या नाटकाच्या विरोधात आवाज उठवला होता. नंतर हे कथानक काल्पनिक आहे अशी टिपणी या नाटकाच्या शेवटी टाकण्यात आली होती तरीदेखील हा वाद थांबला नव्हता.
नाटकाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. सर्व ठिकाणचे प्रयोग हाऊसफुल्ल होऊ लागले. नाटकाच्या सादरीकरणाचा प्रयोग मराठी नाटकात मैलाचा दगड ठरला. बोलता बोलता ‘घाशीराम’ नावाचं चक्रीवादळ सर्वत्र घोंघावत सुटलं. त्या नाटकावर चर्चा सुरू झाल्या आणि त्यात ब्राह्मणांवर हेतुपुरस्सर केलेली कुजकट टीका हळूहळू वाढू लागली. आंदोलने होऊ लागली होती. ब्राह्मण-अब्राह्मण वाद वाढत चालला होता. त्यावेळचा जनसंघ, हिंदुमहासभा, शिवसेना या संघटनेच्या लोकांनी एकत्र येऊन नाटकाला तीव्र विरोध केला होता.
महाराष्ट्रात हे नाटक खूप गाजत होते तेव्हा बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे निमंत्रण या नाटकाला आले. जेव्हा हे नाटक परदेशी जायला निघालं तेव्हा एकच राजकीय धुरळा उडाला. बाळासाहेब ठाकरे यांनी कडक भूमिका घेऊन आणि ‘घाशीराम’ वर सडकून टीका करून ‘ही माणसे परदेशी कशी जातात पाहू. आणि गेलीच, तर परत कशी येतात ते पाहू!’ असा इशारा दिला. यात त्यांचा राजकीय वगैरे हेतू काय होता हे नाटक कंपनीला स्पष्ट होत नव्हते.
पण आंदोलनकर्त्यांनी भूमिका मांडली कि, नाटक बर्लीन ला जाणार नाही. तिथे प्रयोग झाला तर नाना फडणीस ची बदनामी होईल. तसेच तत्कालीन इंदिरा गांधीं सरकारच्या मंत्रिमंडळातील माहिती प्रसारण मंत्री वसंत साठे यांनी ”हे नाटक बर्लिनला पाठवणे म्हणजे देशाची प्रतिमा मलिन होण्यासारखे आहे” असे विधान केले होते. परंतू शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे नाटक मंडळी बिथरले होते. पण सरतेशेवटी नाटक परदेशी गेलं आणि सुखरूप प्रयोग यशस्वीरित्या परतही आलं होतं. पण याचं श्रेय जाते ते शरद पवार यांना कारण आंदोलनाच्या तणावग्रस्त वातावरणात सुद्धा घाशीराम कोतवाल चा प्रयोग जर्मनीत होणार हे पक्कं ठरलं ते ही शरद पवारांनी केलेल्या सहकार्यामुळे.
नाटकात काम करणारी मंडळी पुण्यातली होती, आणि जर्मनीला निघण्यासाठी पुणे-मुंबई प्रवास करणे आवश्यक होतं. विरोध करणाऱ्या संघटनांना याची माहिती मिळाली की हि टीम पुण्याहून मुंबईला निघणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे-मुंबई जुना हायवे वरील खोपोलीजवळ गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. याची बातमी जब्बार पटेल आणि मोहन आगाशे यांना कळली आणि त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवारांना यात हस्तक्षेप करावा आणि आम्हाला मदत करावी अशी विनंती कलाकार मंडळींनी केली होती. पवारांनी त्यांचे मित्र किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर आणि उद्योगपती नीळकंठ कल्याणी यांच्या मदतीने घाशीरामच्या टीम ला पुण्याहून मुंबई विमानतळावर पर्यंत चार्टर विमानाने पोहचले. प्रयोग आटपून जेंव्हा टीम परत पोहचली तेंव्हा मात्र सगळे चित्र बदलले होते. त्यांचे विमानतळावर मोठे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतरच्या काळात या नाटकाचे जगभरात प्रयोग झाले.
या नाटकाच्या विषयक खूप उलटसुलट सतत लिहिले गेलेले आहे. या नाटकावरून अनेकदा राजकीय गदारोळ झाले आहेत. नाना फडणवीस यांची तसेच एकूण ब्राम्हण समाजाची बदनामी केली जात आहे अशी अफ़वा पसरवली गेली. अस्मिता दुखावण्याची आणि त्याचे राजकारण करण्याची ती सुरुवात होती. वस्तुतः त्या नाटकात सत्ता आणि हिंसा हा प्रधान विषय आहे. त्या जोडीने लैंगिकता आणि अधःपतन हे विषय त्यात आहे. या साऱ्या पोटी माणसाचे जनावर कसे होते हा तेंडुलकरांनी विषय हाताळला होता. आणि नेमका तोच विषय प्रेक्षकांना हादरवून टाकत असे. लोककला आणि लोकसंगीत याचा लवचिक वापर या नाटकात होता. त्या द्वारे ही कथा मांडली जात असे. १८१८ ला पेशवाई बुडाली आणि इंग्रजांनी राज्य स्थापन केले . त्या उत्तरार्धात घडणारी ही राजकीय आणि सामाजिक वेध घेणारी भेदक कथा आहे. थोडक्यात तेंडुलकरांना यातून कसलाही सामाजिक संदेश वैगेरे द्यायचा नव्हता तर या अधःपतनाचे दर्शन त्यात घडवायचे होते. हे सत्य नग्न आणि अक्राळविक्राळ होते ते धीराने नाटकातून त्यांना उलगडायचे होते. बंडखोर कलाकार आधीच्या साऱ्या चौकटी मोडून टाकत असतो. तसे तेंडुलकर करत होते. त्याकाळच्या भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि अराजकता याचे आताच्या काळाशी तंतोतंत जुळणारी परिस्थिती वर परखड भाष्य करणारे हे नाटक लिहले. परंतू हे नाटक वादात सापडल्यानंतर त्यातल्या काही घटनांना ऐतिहासिक आधार नसल्यामूळे तेंडुलकर यांनी प्रस्तावनेत त्याचा उल्लेख ‘अनैतिहासिक दंतकथा’ असे लिहले.