बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडामध्ये बाळ बोठेला हैद्राबाद येथून अटक
हैदराबाद: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैद्राबाद येथून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आता सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अजित पाटील यांनी सखोल तपास करून आतापर्यंत पाच आरोपींना जेरबंद केले होते. याप्रकरणी भक्कम पुराव्याच्या आधारे सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, या प्रकरणातील फरार घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. सरकारी वकिलाच्या नियुक्तीच्या अनुषंगाने मयत जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी अॅड. यादव यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले आहे .
यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाच्या खटल्यात मुंबईतील ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव – पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती . यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे . रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी जातेगाव घाट , सुपा ( ता . पारनेर , जि . अहमदननगर ) येथे संगनमताने कट करून धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती . यात तपासाअंती पोलिसांनी पत्रकार बाळ बोठे याला आता पोलिसांनी अटक केली आहे.