बाबासाहेबांच्या ‘त्या’ भाषणामुळे काँग्रेसचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला…

Babasaheb's 'that' speech changed the way the Congress looked at him.
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे ध्येय व उद्देश स्पष्ट करणारा ठराव मांडला गेला. या वेळी मुस्लीम लीगने घटना समितीवर बहिष्कार घातला होता. जोपर्यंत मुस्लीम लीग आणि संस्थांने यांचे प्रतिनिधी येत नाहीत, तोपर्यंत ठराव संमत करू नये अशी सूचना डॉ. जयकरांनी मांडली. यावर वल्लभभाई पटेल, मसानी इत्यादी नेत्यांनी टीका केली होती.

काँग्रेस सरकार दिनांक २९ जून रोजी स्थापन झाले. मुंबई विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुणे येथे दिनांक १५ जुलैला सुरू झाले. आंबेडकर अनुयायांनी आपल्या मागण्यांकडे जनतेचे व सरकारचे लक्ष वेधण्यात करिता भारतभर सत्याग्रह सुरू केला. पुण्याला दिनांक १५ जुलैला सत्याग्रह सुरू झाला. नागपूर, कानपुर, लखनऊ वगैरे प्रांतिक विधिमंडळात असलेल्या शहरात हे सत्याग्रह करण्यात आले. या सत्याग्रहात दलित फेडरेशनचे बहुतेक कार्यकर्ते हजारो अनुयायांसह जेलमध्ये गेले. आंबेडकरांनी समोर जाहीर केले की, “हा लढा त्रिमंत्री शिष्टमंडळाच्या योजने विरुद्ध आहे. वेळप्रसंगी गरज पडल्यास मीही तुरुंगात जाईन.” सत्याग्रही जेल मध्ये जाताना, पुणे करार रद्द करा, शासनकर्ती जमात बनणे, हे आमचे ध्येय आहे, आंबेडकर जिंदाबाद, वगैरे घोषणा करीत होते.

वृत्तपत्रांना दि. २१ जुलै रोजी दिलेल्या मुलाखतीत डॉ. आंबेडकर म्हणाले, “ब्रिटिश भारत सोडणार आहेत. आम्ही काँग्रेसला विचारीत आहोत की, सहा कोटी दलितांचे आगामी घटनेत कोणते स्थान राहील हे जाहीर करा. अस्पृश्यांचे न्याय्य हक्क मिळविण्यासाठी आम्ही सर्व भारतभर लढा सुरू करू. आमच्या स्वयंसेवकांनी जी अहिंसा वृत्ती पाळली, जी की गांधीजींना सुद्धा आदर्श वाटेल.” पुणे करार रद्द झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती. सुमारे पंधरा दिवस चाललेल्या सत्याग्रहाच्या दडपणाने विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलावे लागले.

काँग्रेसला नेत्यांना आंबेडकरांशी बोलणी करावीशी वाटली. मुंबई प्रांतिक काँग्रेसचे नेते स. का पाटील यांनी सिद्धार्थ कॉलेजात आंबेडकर यांची दिनांक २७ जुलैला भेट घेतली व चर्चा केली. नंतर ते वल्लभभाई पटेल यांनाही भेटले परंतु काहीही फलनिष्पत्ती झाली नाही. व्हाइसरॉयने २४ ऑगस्ट रोजी हंगामी मंत्रिमंडळात जगजीवनराम यांचा समावेश करण्यात आला. याच सुमारास दलित फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक पुण्यात सुरू होती. जगजीवनराम यांनी मंत्रिपद स्वीकारू नये अशी कार्यकारिणीने त्यांना विनंती करणारी तार केली. तसेच सर्व बहुमानाचा पदव्यांचा दलित वर्गीयांनी त्याग करावा असा ठराव करण्यात आला. त्यानुसार अनेक कार्यकर्त्यांनी रावसाहेब व राव बहादुरकीचा राजीनामा दिला.

मुस्लिम लीग ने २ ऑक्टोबरला हंगामी मंत्रिमंडळात प्रवेश केला. आपल्या मागण्याचा तर्क ब्रिटिश सरकार मार्फतच लागेल या अपेक्षेने शेवटचा प्रयत्न करावा म्हणून डॉ आंबेडकर १५ ऑक्‍टोबरला लंडनला रवाना झाले. “मंत्रिमंडळाने अस्पृश्यांचा विश्वासघात केला.” असे त्यांनी पाहताक्षणीच वार्ताहरांना निवेदन दिले. त्यांनी एक निवेदन तयार करून ते सर्व पक्षांच्या प्रमुखांना रवाना केले. ब्रिटनचे प्रधानमंत्री ऍटली व भारत मंत्री या दोघांना ते ३१ ऑक्टोबरला भेटले त्यांना आपली बाजू समजून सांगितली. लोकसभेतील हुजूर व काही मजूर सदस्यांची बैठक बोलावून त्यांच्या पुढे त्यांनी दलितांच्या मागण्या समजावून सांगण्याची पराकाष्ठा केली. अस्पृश्यांचा प्रश्न ते स्वतःच्या जीवनमरणाचा प्रश्न समजून रात्रंदिवस लढत होते. सर्व दृष्टीने प्रयत्न केल्यानंतर ते भारतात परतले. त्यादरम्यान हंगामी मंत्रिमंडळात मुस्लिम लीग तर्फे बंगालचे शे. का. फेडरेशनचे पुढारी जोगेंद्रनाथ मंडल यांना विधिमंत्री म्हणून घेण्यात आले होते.

घटना समिती ९ डिसेंबर १९४६ पासून भरली. मुस्लिम लीग नेत्यांनी घटना समितीवर बहिष्कार टाकला. दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे ध्येय व उद्देश स्पष्ट करणारा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला डॉक्टर जयकर यांनी उपसूचना सुचविली. मुस्लीम लीग व संस्थाने यांचे प्रतिनिधी येईपर्यंत हा ठराव संमत करू नये अशा अर्थाची ती उपसूचना होती. डॉ. जयकर हे तत्कालीन भारताचे महान कायदेपंडित समजले जायचे. परंतु डॉ. जयकरांवर, वल्लभ भाई पटेल, मसानी आधी काँग्रेस वाल्यांनी कडक टीका करून त्यांना गप्प केले.

इतक्यात घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. आंबेडकर यांना बोलण्यास विनंती केली. अकस्मात आलेल्या या सूचनेने काँग्रेस वर्तुळातही कुजबुज सुरु झाली. परंतु आंबेडकर उभे राहिले आणि सभोवार पाहून धीरगंभीर आवाजात त्यांनी भाषणास सुरुवात केली. सुमारे पाऊण तास त्यांच्या वक्तृत्वाचा ओघ सुरू होता. घटना समितीच्या इतिहासातील अवर्णनीय वक्तृत्वाचा तो एक अविस्मरणीय दिवस समजला गेला.

बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले, “आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुभंगले गेलो असलो तरी परिस्थिती आणि वेळ येताच आपल्या एकीमध्ये कोणीही अडथळा करू शकणार नाही. जरी मुस्लिम लीग हिंदुस्थानच्या फाळणी साठी चळवळ करीत आहे, तरी एक दिवस असा उजाडेल ज्यादिवशी अखंड हिंदुस्थान सर्वांसाठी हितकर आहे असे त्यांनाही वाटेल.” बर्कचे वाक्य उद्धृत करून ते म्हणाले, “सत्ता देणे सोपे असते परंतु शहाणपणा देणे कठीण आहे. आपल्याबरोबर सर्वांना घेऊन जाण्याची व शेवटी एकी होईल असा मार्ग स्वीकारण्याची ताकद व शहाणपणा आपल्या अंगी आहे हे आपल्या वागणुकीने प्रत्ययास आणून द्या.”

“राज्यघटना कितीही चांगली किंवा वाईट असली तरी शेवटी ती चांगली वाईट ठरणे हे जे राज्यकर्ते तिचा वापर कसा करतील यावरच अवलंबून आहे. हिंदूच्या जातीभेद आणि पंथभेद या जुन्या शत्रूंमध्ये परस्परविरोधी असलेल्या नवीन पक्षांची भर पडली आहे. या जाणिवेमुळे माझी चिंता दुणावली आहे. जर पक्षांनी आपले पक्षमत राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे नष्ट होईल. म्हणून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करताना घटनात्मक साधनांचा मार्ग अवलंबिला पाहिजे. असहकार, कायदेभंग, आणि सत्याग्रहाचे मार्ग वर्ज्य केले पाहिजेत”.

हे घटनाबाह्य मार्ग म्हणजे केवळ अराजकतेची बाराखडी होय. लोकशाहीला दुसरा धोका विभूतीपूजेचा आहे. जॉन स्टुअर्ट मिल लोकशाहीच्या संरक्षकास इशारा देताना म्हणतो, “एखादा माणूस कितीही थोर महान असला तरी त्याच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये. ज्या थोर लोकांनी आयुष्यभर राष्ट्रसेवा केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी परंतु कृतज्ञेस मर्यादा असावी.” पुढे आयरिश देशभक्त आकोनेल म्हणतो, “आपल्या अब्रुचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. स्वाभिमानाचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही. केवळ राजकीय लोकशाहीत समाधान मानू नये. राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीत परिवर्तित केले पाहिजे. सामाजिक लोकशाही समता, स्वातंत्र्य व बंधुता या जीवनमूल्यांना ओळखते. सामाजिक समता नसेल तर मूठभर लोकांचे राज्य जनतेवर असल्यासारखे होईल.”

आंबेडकरांच्या या भाषणामुळे त्यांच्याकडे काँग्रेसचा पाहण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला. सर्व भारतीय वृत्तपत्रांनी अखंड हिंदुस्थानची घोषणा या शीर्षकाखाली आंबेडकरांवर स्तुतीसुमने उधळली. आचार्य अत्रे यांनी त्यादिवसापासून आंबेडकर यांच्या विरोधात न लिहिण्याची शपथ घेतली. जे हात दगड मारायला निघाले त्यांनी पुष्पवर्षाव केला असे त्यांनी त्या प्रसंगाचे वर्णन केले. ‘विविधवृत्त’ कारांनी शेक्सपिअरच्या जुलियस सीझर नाटकातील सिझरच्या वर्णनात बदल करून आंबेडकर उभे राहिले त्यांनी पाहिले आणि जिंकले असे मार्मिक वर्णन केले. निंदक म्हणून गणले गेलेले आंबेडकर आता घटना समितीचे सल्लागार बनले. त्यांच्या याच भाषणामुळे ठराव पुढे ढकलण्यात आला व तो नंतर २० जानेवारी १९४७ रोजी संबंध करण्यात आला होता. बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रीय आंतरिक एकतेचा उद्घोष केला आणि ते घटनेचे शिल्पकार झाले.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *