आदिवासी महिलेचा बलात्कार करून खून पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

रायगड: राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. मात्र, याकडे लक्ष द्यायला कुठलीही यंत्रणा नसल्याचे रायगड जिल्ह्यातील प्रकरणावरून पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एका वीटभट्टी कामगार कातकरी महिलेवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. अखेर सामाजिक कार्यकर्ते सचिन आशा सुभाष, पेण येथील काँग्रेस पदाधिकारी नंदा म्हात्रे यांनी प्रयत्न केल्या नंतर अखेर FIR दाखल करण्यात आली आहे. पिडीत महिलेवर ३१ मार्च रोजी बलात्कार करण्यात आला. एका रिक्षा चालकाने हे कृत्य केल्याची शंका आहे.
घटना जाणून घेऊ
पिडीत महिला ४२ वर्षाची आहे. घरी लग्न असल्याने पिडीत महिला ही आपल्या नवऱ्याला (वारद-माजगाव ता. खालापूर, जि. रायगड) वीटभट्टीवरून आणण्यासाठी सकाळी १० च्या दरम्यान जवळच्या गावातील रिक्षा भाड्याने घेऊन निघाली होती. दुपारी २ च्या दरम्यान सदर रिक्षाचालक वीटभट्टीवर तिच्या नवऱ्याकडे गेला व त्याने तुझी बायको तुला न्यायला आली आहे व मालक सुट्टी देणार नाही म्हणून इथं न येता पुलाखाली थांबली आहे तर तू पटकन आवरून चल असे म्हणाला. नवरा जेव्हा १०० मीटरवरच असलेल्या त्या पुलाखाली पोहोचला तेव्हा त्याला कडेच्या झुडुपात बायको मृत अवस्थेत पडलेली आढळली. नवऱ्याने त्या रिक्षा चालकास बायकोला दवाखान्यात नेऊ असे म्हटले असता रिक्षा चालक मला काम आहे सांगून तिथून निघून गेला. त्यानंतर वीटभट्टी मालकाच्या गाडीतून दवाखान्यात नेले असता महिला मृत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी केली चक्कर येऊन पडल्याची नोंद
नवऱ्याने तिला हेमडी या गावी अंत्यसंस्कारासाठी आणले. मात्र गावातील महिलांनी मृत महिलेस तपासले असता तिच्या अंगावर अंतर्वस्त्रे नव्हती, गुप्तांगाला सूज आलेली होती व विर्यसदृश्य काहीतरी तिथे सांडल्याचे आढळले. तसेच अंगावरील साडी ही नेसलेली नसून गुंडाळलेली दिसली. यावरून बलात्कार झाल्याचे लक्षात येऊन हे कृत्य रिक्षावाल्यानेच केल्याचा संशय आल्याने रात्री १० वाजता पुन्हा पती व इतर लोक महिलेला घेऊन पोस्टमार्टेमसाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. मात्र डॉक्टर नसल्याने त्यांना सकाळी ९ वाजता या असे सांगण्यात आले. त्याचवेळी ते खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले मात्र पोलिसांनी बलात्कार व खून अशी FIR दाखल न करता महिला चक्कर येऊन मृत पावली असा Accidental death report लिहून घेतला.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सचिन सुभाष यांनी फेसबुक पोस्ट लिहून आलेल्या अनुभवा सांगितला आहे.
१ एप्रिलरोजी सकाळी ९ वाजता मी हेमडीत प्रकल्पावर गेल्यानंतर मला सदर प्रकरण समजले. मी खालापूरला गेलो असता अजून FIR व postmortem झाला नसल्याचे समजले. आधी FIR होणं अत्यंत गरजेचं आहे हे मी त्या लोकांना समजावून सांगितलं. गावातील एकजण सरकारी सेवेत तलाठी आहेत त्यांनाही ही बाब लक्षात आली. ते व मी गावातील लोकांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी ADR च्या आधारे तपास होईल व मग FIR दाखल होईल असे आम्हाला सांगितले. आम्ही वरिष्ठांना भेटायचे आहे असे सांगितले. आम्ही पोलिस निरीक्षक, DySP यांना भेटलो तर ते आधी postmortem होऊद्या, त्याचा काय report येतो ते पाहून त्यानुसार FIR करू असे सांगू लागले. गावातील लोक FIR ची मागणी करत होते मात्र पोलीस त्यांना वेगवेगळी कारणं देत टाळत होते. आश्चर्याची बाब म्हणजे टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये एक महिला पोलिस अधिकारी ही होत्या. मग मी स्वतः वकील आहे हे सांगून FIR व postmortem चा काही संबंध नाही त्यामुळे तुम्ही FIR घ्या असे सांगितले. तसेच आम्ही सर्वांनी जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत आम्ही deadbody ताब्यात घेणार नाही असं ठणकावून सांगितल्यावर मग पोलिस जरा नीट बोलू लागले व FIR घ्यायला तयार झाले. हे सगळं होईपर्यंत १ वाजले होते, मृत्यू होऊन २४ तास व दवाखान्यात deadbody आणून १४ तास उलटले होते मात्र अजूनही postmortem करणारे डॉक्टर आले नव्हते. अजूनही FIR झाला नव्हता ही वाईट बाब आहे.
त्यानंतर डॉक्टर आले. पेण येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्या नंदा म्हात्रे ही त्याचवेळेस आल्या. आम्ही पुन्हा DySP यांची भेट घेऊन निःपक्षपातीपणे तपास करण्याची विनंती केली. तोपर्यंत रिक्षाचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मी महिलेच्या नवऱ्यासोबत FIR द्यायला बसलो तर नंदाताई, २ डॉक्टर, महिला पोलिस अधिकारी व गावातील २ महिलांसोबत Postmortem साठी गेल्या. मृत्यू होईन २४ तास उलटून गेल्याने शरीर फुगून त्यात अळ्या पडल्या होत्या व प्रचंड वास सुटला होता. FIR ची कच्ची copy तयार व्हायला ४ वाजले. त्यानंतर पोलीस, नवरा व आम्ही घटनास्थळी spot पंचनामा करण्यासाठी गेलो. त्यानंतर ५ वाजता FIR ची copy घेऊन deadbody ताब्यात घेतली व संध्याकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार पार पडले.
जेव्हा इतर ठिकाणी बलात्कार होतात तेव्हा मोर्चे निघतात, बातम्या होतात पण इथे एका आदिवासी महिलेचा बलात्कार होऊन खून झाला तरी साधा गावचा सरपंच, पोलीस पाटील देखील अंत्यसंस्काराला नसतो ही लाजिरवाणी बाब आहे. मीडिया तर सोडा पण social media वर देखील याविषयी काहीच चर्चा होत नाही. आदिवासी कधी आणि कसा जन्मतो आणि कधी आणि कसा मरतो याकडे कुणाचंच लक्ष नसतं हे दुर्दैवाने वास्तव आहे. साधा FIR व्हायला १८ तास वाट पाहायला लागते तर न्याय मिळणं खुप अवघड बाब आहे.
आत्मस्तुती नाही पण मी, नंदाताई व ते तलाठी जर नसते तर हे प्रकरण FIR न होताच चक्कर येऊन मृत्यू जाहीर करून निकाली निघालं असतं आणि गुन्हेगार अजून एक बलात्कार आणि खून करायला मोकाट सुटला असता. ज्याच्या पाठीमागे कोणी नाही त्याच्या पाठीमागे व्यवस्था पण नाही हे वास्तव आहे.
पोलिसांच्या केबिन मधून बाहेर निघताना आमचा एक कातकरी पोलिस अधिकाऱ्यांना हात जोडून म्हणाला “साहेब, एक विनंती आहे आम्हा आदिवासी लोकांना पोलिस स्टेशनात नीट वागणूक मिळत नाही. आम्ही पण माणसंच आहोत आम्हाला नीट वागणूक मिळावी एवढी अपेक्षा आहे.” त्यावर हसत अधिकारी म्हणाले “काय करणार, सगळ्या महाराष्ट्रात असंच आहे.” कातकऱ्याची विनंती आणि अधिकाऱ्यांचं त्यावर उत्तर यात सगळी केस सामावली आहे. असल्याचे सचिन याने लिहिले आहे.