वयाच्या २१व्या वर्षी विक्रम गोखलेंनी महानायक अमिताभ बच्चन बरोबर काम केलं होतं

मराठी चित्रपट सृष्टीतले जेष्ठ नेते विक्रम गोखले यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते, मात्र, ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते असे हॉस्पिटलकडून सांगण्यात येत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. या अफवेचे हॉस्पिटल आणि गोखले कुटुंबियांकडून खंडन करण्यात आले होते.
मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी चार वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदीर येथे ठेवण्यात येणार आहे . संध्याकाळी ६ वाजता वैकुंठ स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (पूर्वाश्रमीच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या १९१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहिनी भस्मासुर’ चित्रपटात दुर्गाबाई यांनी पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.
अभिनय क्षेत्रात आपली संपूर्ण हयात घालवूनही उपेक्षित राहिलेल्या कलाकारांना त्यांच्या वृद्धापकाळी हक्काचे घर असावे या उद्देशातून विक्रम गोखले यांनी स्वत:ची जागा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली होती. सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी होते.
पुरस्कार नाकारणारे अभिनेते:
विक्रम गोखले यांचा कोणत्याही पुरस्कारांवर विश्वास नव्हता. त्यांनी शासकीय पुरस्कारांनाही नकार दिला होता . एका मुलाखतीत त्यांनी आपलं मत मांडताना सांगितलं होतं की, ‘पुरस्कार सोहळे हे फक्त फॅशन झाली असून पैसे खिशात घेऊन पुरस्कार घेणारे मी पाहिले आहेत.
अशा मांदियाळीत मला बसण्यात स्वारस्य नाही. कोणत्याही पुरस्काराने एखादा नट चांगला आहे की नाही हे सिद्ध होत नाही. त्याचं कामच बोलतं.’
विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 1971 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. या सिनेमाचे नाव ‘परवाना’ असे होते. ‘हम दिल दे चुके सनम’ या ब्लॉकबस्टर सिनेमात विक्रम गोखलेंनी काम केलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या माध्यमातून कमबॅक केलं होतं.