|

शिंदे गटात सामील होताच ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून किर्तीकरांवर आगपाखड.

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांनतर उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार एकापाठोपाठ किर्तीकरांवर तुटून पडताना दिसत आहेत. शिवसेनेतून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर संजय राऊत,चंद्रकांत खैरे,अंबादास दानवे या नेत्यांनी गजानन किर्तीकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे:
गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे मला दु:ख झाले आहे. ते सुरुवातीच्या काळात आमचे मार्गदर्शक होते. त्यांनी आम्हाला घडवलं आहे. गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांसोबत काम केले होते. या काळात पक्षाने त्यांना पाचवेळा आमदारकी आणि दोनवेळा खासदार होण्याची संधी दिली. इतकं सगळं दिल्यानंतरही गजानन किर्तीकर या वयात गद्दारांसोबत गेले.

गजानन किर्तीकर यांना काही गोष्टी पटत नव्हत्या तर त्यांनी पक्षात राहून मत मांडणे गरजेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे अडीच वर्षे सरकार होते. ही बाब मान्य नव्हती तर गजानन किर्तीकर यांनी पहिल्याच दिवशी विरोध करायला पाहिजे होता. आता ते उगाच काहीतरी बोलत आहेत, त्यांना म्हातारचळ लागलाय अश्या शेलक्या शब्दात चंद्रकांत खैरेंनी गजानन कीर्तिकांवर टीका केली आहे.

गजानन किर्तीकर फुटकळ कारणे देत आहेत- अंबादास दानवे

गजाभाऊ हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते राहिलेले आहेत. मराठवाडा, जालन्यात त्यांनी सुरुवातीच्या काळात मोठे काम केले आहे. अशा नेत्यांनी संघटना सोडणं धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. त्यांच्याकडून पक्ष सोडण्यासाठी फुटकळ कारणं देण्यात आली. गजानन किर्तीकर यांची यापूर्वीची भाषणं काढून पाहिली तर त्यांनी जीव तोडून भाजपवर टीका केली आहे. त्यांच्याच विभागात भाजपने त्यांना त्रास कसा दिला, हे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. पक्ष सोडताना काही कारण द्यावी लागतात, म्हणून ते काहीही बोलत आहेत, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले.

गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेल्याने आमच्या पक्षात थोडीशी सळसळही झालेली नाही. ते शिंदे गटात गेल्याने विशेष फरक पडत नाही. उद्या लोकं त्यांना विसरून जातील, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. गजानन किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षाने त्यांना काय दिलं नाही? किर्तीकर पाचवेळा आमदार राहिले, दोनवेळा मंत्रिमंडळात होते. दोनवेळा पक्षाने त्यांना खासदारकी दिली. त्यांचे पूत्र अमोल किर्तीकर हे ठाकरे गटासोबत राहिले आहेत. त्यामुळे आमच्या गजानन किर्तीकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते सगळं मिळूनही पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी शंका उपस्थित होते. असे म्हणत संजय राऊतांनी किर्तीकरांच्या एकनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *