…तो पर्यंत महाराष्ट्र हे राज्य कोणत्याही जातीचं होणार नाही
आदरणीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज महाराष्ट्रभर आपापल्यापरीने, वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होईलच परंतु यानिमित्ताने आजच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक दृष्टीने त्यांच्या विचारांचे चिंतन करणे गरजेची बाब आहे. चव्हाण साहेबांची दूरदृष्टी, त्यांचे नेतृत्व सबंध देशाला दीपस्तंभासारखे आहे. म्हणून त्यांच्या विचारांचे मंथन होणे गरजेचे आहे. आज देशापुढे राज्यापुढे जातीयवादाचे आव्हान उभे राहिलेले आहे, ज्या समस्या आहेत, जे राष्ट्रीय प्रश्न आहेत; त्यांचा ऊहापोह व्हावा, विचारांचे आदान-प्रदान व्हावं असं वाटतं!
दैनिक लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या व्याख्यानात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मानवंदना देताना उल्लेख केला कि,यशवंतराव तयार व्हायला फार वर्ष लागतात, यशवंतराव तयार व्हायला फार प्रचंड अध्ययन लागतं आणि यशवंतराव तयार व्हायला फार मोठा त्याग लागत असतो! ज्या काळामध्ये यशवंतरावांच्या दूरदर्शी नेतृत्वाने महाराष्ट्राचे उभा केला तसाच नंतरच्या काळामध्ये पुन्हा कोणालाही उभा करता आला नाही. हे आपण स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. मुख्य आव्हान होतं ते महाराष्ट्राची एकात्मता! आणि ती एकात्मता त्यांना अतिशय अल्पावधीत साधता आली. त्या माणसाचं कर्तुत्व असं होतं की त्यांना ते साध्य करता आले.
अशाच काळात एकदा यशवंतराव चव्हाण साहेब यांना उद्देशून साहित्यकार गजानन माडखोलकर असं म्हणाले होते की, राज्य मराठीचं असणार आहे की, मराठ्यांचं असणार आहे? तर त्या वेळच्या महाराष्ट्र सुद्धा असा होता की एखाद्याला असे प्रश्न विचारण्याची हिंमत होत होती.
यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे, ” माझे मित्र महाराष्ट्रातील थोर साहित्यिक गजाननराव माडखोलकर यांनी असा प्रश्न विचारला की, राज्य मराठीचं होणार आहे की, मराठ्यांचं होणार आहे? माझी त्यांना विनंती आहे की साहित्यिकांनी विचारवंत आणि समाजामध्ये भंगता निर्माण होईल- फूट पडेल, असे प्रश्न उपस्थित करू नयेत. आधीच दुभंगलेली मने महाराष्ट्रात एकत्र आलेली आहेत, त्यातून अभंग महाराष्ट्राची सफर फार लांब पल्ल्याची आहे आणि लांब पल्ल्याची ही सफर करणं फार अवघड गोष्ट आहे. माडखोलकरांनी पहिली विनंती आहे की, तुम्ही असे प्रश्न जाहीरपणे उपस्थित करू नका. आता त्यांनी प्रश्न विचारला आहेच, तर मी उत्तर देतो. जोपर्यंत मी महाराष्ट्राचं, देशाचं, जनतेचं नेतृत्व करतोय; तोपर्यंत महाराष्ट्राचं हे राज्य कोणत्याही जातीचं होणार नाही. मराठी जात म्हणून मराठी ही वृत्ती आहे, म्हणून आचार्य अत्र्यांनी आपल्या वृत्तपत्राला ‘मराठा’ हे नाव दिलं होतं.”
यशवंतराव चव्हाण यांनी हे जाहीर भाषण सांगितलं आहे कि, ही वृत्ती आहे. मराठी माणसांची मराठी भाषा, भाषा संचनालय, साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य संमेलन ह्या सगळ्या गोष्टींवर यशवंतराव चव्हाण विचार करायचे. कृषी विद्यापीठाचा ते जेवढा विचार करायचे, वीजनिर्मितीचा ते जेवढा विचार करायचे, पडीक जमिनीचा एवढा विचार करायचे… मराठवाड्याचा, संत परंपरांचा ते जेवढा विचार करायचे,
तेवढाच विचार मुलांचा, मुलींचा, स्त्रियांचा, समाजातील दुर्बल घटकांचा,दलितांचा,आंबेडकरांच्या पुणे कराराचा सगळ्या गोष्टीचा त्यांचा एक विचार असायचा. असं नव्हतं की हे पुणेकर म्हणजे काय असा आजकाल आपल्याकडे टू जी स्पेक्ट्रम म्हणजे काय, अनेकांना माहिती नाही कि, हे काय भानगड आहे फक्त काहीतरी भानगडी आहे तेवढेच माहिती असतं सर्वांना प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचं असतो जो यशवंतरावांचा होता.
एकदा यशवंतरावांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, तुम्ही एवढेच जाती-पाती वर बोलता, तुमच्यातली जात किती संपलेली आहे? यशवंतराव आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, अजून ३५% तरी संपलेली नाही. गांधीजींनी त्यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ मध्ये सांगितले होते की, माझा बाप मरत असताना मी कस्तुरबा यांच्याकडे गेलो होतो रात्री झोपायला. हे सत्य सांगण्याचं सामर्थ्य होतं गांधींजींमध्ये! तेच सामर्थ्य महाराष्ट्र मध्ये प्रज्वलित करणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आचरण करणं, हे आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त खरं स्मरण ठरेल.