“यशवंत” महाराष्ट्र!

"yashwant" maharashtra!
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

संयुक्त महाराष्ट्राचा कलश दिल्लीहून आणून आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करणारे यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. देश-काळ-पात्राचे समग्र भान असणारे, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि राजकारण याचा नेमका समतोल साधू शकणारे, लोकशाही मूल्यांची बूज राखत नवमहाराष्ट्र उभारणीच्या चिरा सर्व भूमिकांच्या विचारांच्या लोकांकरवी घडविणारे, आणि आजच्या साठोत्तरी महाराष्ट्राची वैभव पताका ज्यांनी आपल्या अवघ्या हयातीने तळपवत ठेवली असे यशवंतराव चव्हाण आजच्या आक्रसलेल्या काळात अधिकच प्रकर्षाने आठवतात.
देवराष्ट्रे या छोट्याशा गावात जन्मलेले यशवंतराव गरीब पार्श्वभूमी असतानाही लहानपणापासूनच स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग, कारावास ,विद्यार्थी चळवळी अशा विविध माध्यमातून जनमाणसांत मिसळत गेले. मनापासून स्वीकारलेला काँग्रेसी विचार त्यांनी फक्त राजकारणापुरता मिरवला नाही तर तो अंत:करणापासून जपला.
मुख्यमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि अगदी उपपंतप्रधानपदही विनयाने परंतु तितक्याच तडफेने पेलणारे यशवंतराव महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उगवत्या नेतृत्वासाठी मापदंड बनले नसते तरच नवल.
राजकारणातल्या अपरिहार्य तडजोडी आणि डावपेच सर्वश्रुत असतात. पण, या सगळ्यांपलीकडे तरल संवेदनशीलता, उत्स्फूर्त प्रतिभा, वक्तृत्वाच्या ताकदीचे परिपूर्ण भान, दांडगा व्यासंग, साहित्य आणि समाज यांच्यातील अन्योन्य नात्याचे यथार्थ भान, चतुरस्र अनुभवसंपन्नता, माणसे पारखण्याची आणि घडविण्याची विलक्षण हातोटी असणारे यशवंतराव खालावलेल्या राजकिय नैतिकतेच्या वर्तमानात पुन्हा पुन्हा स्मरणीय ठरतात.
स्वतःच्या चुका मान्य करण्याचा आणि त्यात आवश्यक सुधारणा करण्याचा राजकारणी मंडळींत अभावाने आढळणारा गुण त्यांच्यात होता. आणि म्हणूनच देशाच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांना दिल्लीहून आवतन येत गेले. त्यांनी निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी आणि सहकाराचे जाळे अगदी आजच्या तारखेलाही महाराष्ट्राला स्वयंपूर्ण ठेवण्यात यशस्वी ठरते आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना राजकीय नैतिकता कधीही न सोडणारा नेता म्हणून यशवंतराव वंदनीय ठरतात.
एकदा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी देण्यासाठी फोन केला असता, यशवंतरावांनी आपल्याला यासाठी एका व्यक्तीची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. दस्तुरखुद्द पंतप्रधान एवढी मोठी जबाबदारी देत असताना अजून कोणाची सहमती एवढी महत्वाची असा साहजिक प्रश्न नेहरूंना पडला, तेंव्हा ‘आपल्या सहचारिणीला अर्थात वेणूताईंना विचारावे लागेल’ असं यशवंतराव उत्तरले. यशवंतराव- वेणूताई यांचं सहजीवनही त्यांच्या राजकीय उंचीइतकचं समृद्ध होतं ते याप्रकारे !
शेवटी,
राजा मंगसुळीकर म्हणतात त्याप्रमाणे ,

“हिमालयावर येता घाला सह्यगिरी हा धावून गेला ,
मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला ,
या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने ,
जोवर भाषा असे मराठी यशवंताची घुमतील कवणे”

हे तंतोतंत खरं !!!


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *