त्या ‘फडणवीस’ आहेत म्हणून त्यांना ट्रोल केलं जातंय का?
आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यांनी ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ या आपल्या नवीन गाण्याची पोस्ट शेअर करण्यापूर्वी ट्रोलर्सला इशारा दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं म्हणत त्यांनी ट्रोलर्सला तयार राहायला सांगितलं होतं. त्यांच्या या नवीन गाण्याची निंदा आणि कौतुक दोन्ही केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही. पण, अमृता फडणवीस ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’ पण तरीही त्यांनी वापरलेला ‘सहज संधी’ यामुळे त्यांनी अमृता यांचे कौतुक केले कि त्यांना टोमणा मारला हा ही एक प्रश्न समोर येतो. या ट्वीट मुळे रोहित पवारही ट्विटरवरच्या ट्रोलिंग मध्ये सुटले नाही. “जे आजोबाच्या जिवावर आमदार झालेत त्यांनी दुसऱ्याला सहज संधी मिळाली म्हणणे कितपत योग्य? टोमणे मारून प्रसिध्दीच्या झोतात राहाण्यापेक्षा आमच्या कर्जत मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करा”. अशा प्रतिक्रिया त्यांना ऐकाव्या लागल्या.
एक कलाकार म्हणून त्यांना मान्यता देणे न देणे ही वेगळी गोष्ट आहे. एक कलाकार गायिका म्हणून त्यांना स्वच्छंद आणि मुक्त पणाचा अनुभव मिळत असेल तर ट्रोलकर्त्यांचं नेमकं काय दुखतंय कळेना. त्यांची आवड ही त्यांना फक्त एक कला म्हणूनच नाही, तर एक व्यक्ती, एक महिला म्हणून मोठं करीत असते. अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत म्हणून त्यांना ट्रोल करणाऱ्यांना अमृता फडणवीस यांचा मनाचा खंबीरपणा, त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचा सार्वजनिक क्षेत्रात एक स्वतंत्र, कमावती व स्वच्छंदी स्त्री म्हणून असणारा वावर का दिसत नसावा?
‘मी खूप सुंदर आहे, मी सर्वोत्तम आहे, मला सर्वकाही येतं या भ्रमात त्या जगत नाहीत तर त्या अभिमानाने मी एक कमावती आहे, मला स्वतःची मतं आहेत आणि ते मी निर्भीडपणे व्यक्त करते असे म्हणत त्या जगतात तर यात गैर काय? त्यांना त्यांच आयुष्य आहे, त्या उच्चशिक्षित आहेत. एखाद्या उच्चपदस्थ राजकारण्याची / मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून समाजात वावरणारी स्त्रीची घरंदाज खानदानी पारंपारिक वेशात वावरणारी असावी ही कदाचित आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची बालिश अपेक्षा असावी. आता ‘ती’ स्त्री स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व घेऊन समोर येतेय, जे पिढ्यानपिढ्या युगानुयुगे चाललं आहे ते बदलते आहे. स्वतःच्या मनासारखं जगते तर तिला त्याची किंमत तर चुकवावीच लागणार ना? तिची किंमत त्या ट्रोलिंगच्या माध्यमातून चुकवत आहेत. “लंबे चलन का रुख बदलना हैं, तो वक्त तो लगेगा ही!”.
मला त्या स्त्री मध्ये एक आत्ममग्न आणि आत्मविश्वासू स्त्री दिसते. खरंतर आत्ममग्नता हा स्त्रीचा निसर्गसुलभ स्वभावविशेष आहे असे मानले जाते. मात्र पुरुषाला ज्याप्रमाणे विविध क्षेत्रात स्वैर संचार करता येतो त्याप्रमाणे स्त्रीला करू दिला जात नाही. परिणामी तिचे छंद, सुप्तगुणविशेष तिच्या अंतकरणात दडून राहतात. सर्वांपुढे ती तिची आवड कला उघड करायला संकोचते. एखादी स्त्री ही तिच्या स्वतःच्या कपड्यांबाबत जेवढी जागरूक असते तेवढी ती स्वतःची कला प्रदर्शित करायला जागरूक नसते. पण काही स्त्रियांना काहीतरी आगळेवेगळे करून स्वतःची प्रसिद्धी करावीशी वाटते त्यासाठी रंगमंचावर जाऊन प्रेक्षकांची पावती मिळवणे त्या पसंत करतात. मात्र या आत्मविश्वासुपणाची त्या स्त्रीला त्याची मोठी किंमत मोजावी लागते. जरी त्यांचा आवाज अगदी पट्टीतल्या गायकसारखा नसेलही तरी ज्या आत्मविश्वासाने कुठलाही न्यूनगंड न बाळगता त्या लोकांपुढे येत आहेत याची दखल घेण्याची पद्धत जर इतकी घाणेरड्या स्वरूपाची असेल तर यानंतर कुठल्याही राजकारण्याची पत्नी तिच्या त्यांच्या छंदाबाबत उघडपणे बोलायला नक्कीच विचार करेल. म्हणून या ट्रोलकर्त्यांनी आपण ट्रोलिंग करताना कोणत्या थराला जातो आणि त्याचे परिणाम किती खोलवर होत असतील याचे भान बाळगायला हवे.
सत्तेत असो किंवा नसो देवेंद्र फडणवीस यांची पत्नीच्या गायनाबाबतची भूमिका ही विरोधी पक्षनेते असताना देखील कायम राहिली. त्यांनी नेहमीच अमृता यांचे स्वातंत्र्य जपण्याला महत्त्व दिले. ते दोघेही आपापले आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगत आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या अमृता यांच्यावर अनेकदा वैयक्तिक शेरे मारले जातात. अनेकदा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांना खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्या, ज्या मोकळेपणाने वावरायच्या, त्यांचे राहणीमान हे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले, म्हणून त्यांना हे पचनी पडायला अजून थोडा वेळ द्यावा लागेल. प्रथमच एका मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांच्या समारंभामध्ये हजेरी लावणे, काही कार्यक्रमांसाठी गायन केले. यावरून बरीच उलट-सुलट चर्चा झाली मात्र त्या या वाईट-साईट चर्चांमध्ये कधीही अडकून न पडता स्वतःला आवडेल अशाच पद्धतीने जगतात, कुणालाही न घाबरता त्या त्यांची मतं व्यक्त करत असतात. ह्याची मात्र विशेष दखल घेतलीच पाहिजे.
त्या त्यांच्या वादग्रस्त आणि धडक वक्तव्यामुळे नेहेमीच चर्चेत असतात. आडनाव ठाकरे असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही अशा बोचऱ्या शब्दात अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेचे पडसादही उमटले. अर्थातच ते पडसाद ट्रोलिंग आणि आंदोलनाच्या माध्यमातून उमटले होते. बाकी अमृता यांनी अर्थसंकल्पाबद्दल केलेल्या ट्वीटला विरोध करणं किंवा प्रत्युत्तर देणे ही वेगळी बाब आहे. मात्र त्यांच्या गायकीच्या छंदामुळे त्यांना त्यांच्या ‘आवाजापेक्षा गाई-म्हशीचे हंबरणे परवडले पण त्यांच्या आवाजाने कानाचे पडदे फाटतात’ असे म्हणणे कितपत रास्त आहे? त्यांच्याबाबत होणारे ट्रोलींग हे सामान्य वर्ग करतोय की स्वतःला पुरोगामी समजणारे लोकं? पुरोगामी महाराष्ट्रातल्या पुरोगामी पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भाजपाच्या आयटी सेल प्रमाणेच एक ट्रोलिंग गॅंग तयार झाली आहे. अमृता यांना ‘फडणवीस’ आहेत म्हणून ट्रोल करताना, त्या तरुणांना याचं भान नव्हतं का, कि त्यांच्या गाण्याचा विषयच सामाजिक समस्या म्हणजे स्त्री भ्रूण हत्येवर आधारित होता. महिलांना ट्रोल करताना त्याचे परिणाम हे त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रात असणाऱ्या स्थानावर होते हे स्वतःला बुद्धिजीवी समजणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नसावे का?
आजच्या राजकीय, सामाजिक आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातले हे एक सत्य आहे कि, प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या कारणासाठी ‘ट्रोल’ होतो आहे. ट्रोलिंगची परंपरा तशी जुनीच आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत,त्या आधीच्याही लोकसभेच्या निवडणुकीत तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत होणाऱ्या ट्रोलिंग ने प्रचंड असा धुमाकूळ घातला आहे. ही ट्रोलर एक संघटित अशी संस्था आहे. ही संस्था एखाद्या टोळधाडी प्रमाणे असते, एकदा का टोळधाड आली की सगळे शेतच खाऊन टाकते. त्याचप्रमाणे हे ट्रोलर एखाद्या व्यक्तीचे सामाजिक, नैतिक व राजकीय चारित्र्यहनन सुद्धा करतात. ज्यांची त्यांनी सुपारी घेतली त्याचे गुणगान गात, गोडवे गात त्या उमेदवारांमध्ये नसलेल्या गुणाचे प्रदर्शन करीत त्याला नेता म्हणून पुढे आणतात आणि प्रस्थापित ही करतात. अर्थातच याची पुरेपूर किंमत ते वसूलही करतात. मी कुठल्याही विशिष्ट पक्षाबद्दल बोलत नाही तर हे सगळीकडेच आहे.