रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मुंबईतील ‘या’ ख्यातनाम वकिलाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
नगर: यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाच्या खटल्यात मुंबईतील ख्यातनाम ज्येष्ठ वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी कट करून हत्या करण्यात आली होती. यात तपासाअंती पोलिसांनी पत्रकार बाळ बोठे याला मुख्य सूत्रधार घोषित केले होते .
असा होता खुनाचा घटनाक्रम
नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रेखा जरे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी त्यादिवशी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिरोज राजू शेख व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे या दोघा आरोपींना जरे यांच्या खून प्रकरणात अटक केली. अटक केल्यानंतर त्यांनी आदित्य सुधाकर चोळके याने सुपारी दिल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे व ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना कोल्हापूरमधून अटक केली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अजित पाटील यांनी सखोल तपास करून आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी भक्कम पुराव्याच्या आधारे सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, या प्रकरणातील फरार घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या नियुक्तीच्या अनुषंगाने मयत जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी अॅड. यादव यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.