आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, तृप्ती देसाईंनी घेतली पत्रकार परिषद

पुणे: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अत्याचाराच्या आरोपानंतर आता आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आज करण्यात आला आहे.
विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी पीडितेसह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. अनेक गंभीर आरोप या पत्रकार परिषदेतून करण्यात आले.
विटेकर यांनी माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत, असा खळबळजनक आरोप पीडितेनं केला आहे. वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचं पोलीस सांगतात अस पिडीतेने सांगितले.
शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही असं राजेश विटेकर म्हणत असल्याचा दावा पीडितेने पत्रकार परिषदेत केला आहे. शरद पवार मला आपला मुलगाच मानतात त्यामुळे ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत असं देखील या पिडीतेला आरोपीने सांगितल्याचे तिने सांगितले आहे.
विटेकर यांनी हे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. ‘माझ्यावरील बलात्काराचे आरोप साफ खोटे आहेत. केवळ ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने आणि माझी राजकीय जीवनातून संपवण्यासाठी हा प्रयत्न आहे,’ असं विटेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. ‘माझ्याकडं या संदर्भात अनेक पुरावे आहेत. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवले जात आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. विटेकर यांनी या प्रकरणी गंगाखेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोणत्याही पद्धतीने माझ्यावर कोणी आरोप करू शकत नाही, असं ते म्हणाले.
कोण आहेत राजेश विटेकर?
- ३९ वर्षीय राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष
- राजेश विटेकर पदवीधर असून शेती व्यवसाय असल्याचाही उल्लेख
- सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती
- परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक
- परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक
- शिवसेना उमेदवार संजय (बंडू) जाधव यांच्याकडून पराभव
- ४ लाख ९६ हजार ७४२ मतं मिळवत विटेकर दुसऱ्या क्रमांकावर
- ५.३ कोटी रुपयांची संपत्ती, तर ८.७ लाखांचे उत्पन्न, प्रतिज्ञापत्रात उल्लेख