कसबा पेठ, पिंपरी-चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकींची घोषणा, महाविकासआघाडी निवडणूक लढवणार का?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

आज निवडणूक आयोगाने त्रिपुरा, नागालँड, मेघालयमध्ये या राज्यांच्या विधानसभा निवडणूक जाहीर करतानाच पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या मतदारसंघाच्या देखील निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात चार पोटनिवडणुका पार पडल्या. ज्यात तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राष्ट्रवादीकडून पंढरपूरची जागा खेचून घेत सुरवात तर जोरदार केली होती. मात्र, नंतर झालेल्या देगलूर, कोल्हापूर या निवडणुकांमध्ये भाजपाला हार पत्करावी लागली. आणि आता थोड्या दिवसांपूर्वी झालेली अंधेरीच्या पोटनिवडणूक तर बिनविरोधाचं झाली.

या पोटनिवडणुकांवेळी नेमकी परिस्थिती काय होती हे बघुयात:

पंढरपूर मतदारसंघ:

हा तसा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार संघ. राष्ट्रवादीचे आमदार भारतनाना भालके यांचे २०२० मध्ये निधन झाले आणि मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने भारत भालकेंच्या मुलाला म्हणजेच भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली तर भाजपनं देखील ही निवडणूक लढविण्याची तयारी केली. त्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची झाली. भाजपकडून समाधान आवताडे यांना भगीरथ भालकेंविरोधात निवडणुकीत उतरविण्यात आले.

राष्ट्रवादीकडून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोंघांच्या निवडणूक स्ट्रॅटेजिवर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची व्हुवरचना भारी पडली.  त्यामुळे या निवडणुकीत अवताडेंनी भालकेंचा पराभव करत विधानसभा गाठली. भाजपने महाविकास आघाडीला पर्यायाने राष्ट्रवादी आणि अजित पवारांना धोबीपछाड दिला. 

देगलूर मतदारसंघ:

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली. काँग्रेसनं या निवडणुकीत त्यांचे  चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली. मात्र, या मतदारसंघाची स्थिती पंढरपूर पेक्षा पूर्णपणे वेगळी होती. पंढरपुरात २०१९ निवडणुकीत राष्ट्रवादी ने भाजपचा पराभव केला होता. मात्र, देगलूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

त्यामुळे शिवसेनेचे पराभूत उमेदवार असलेल्या सुभाष साबनेंनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यामुळे ही निवडणूक देखील महाविकासाआघाडी विरुद्ध भाजप अशीच झाली. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपली सगळी ताकद लावत जितेश अंतापूरकर यांना विजयी केले. भाजप उमेदवार असलेल्या साबनेंना पुन्हा पराभव पत्करावा लागला.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ:

या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झाल्यामुळं या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. इथं पुन्हा काँग्रेसने चंद्रकांत जाधवांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात देखील देगलूर प्रमाणेच सेम कंडिशन होती.

२०१९च्या निवडणुकीत काँग्रेस उमदेवार असलेल्या चंद्रकांत जाधवांनी शिवसेनेचे आमदार असलेल्या राजेश क्षीरसागरांचा पराभव केला होता. त्यामुळे देगलूर सारखाच या मतदारसंघातही सेनेचा पराभूत उमेदवार बंडखोरी करणार ही शक्यता वाढली होती.

मात्र तत्कालीन मुख्यमंत्री तसेच शिवसेनापक्षप्रमुख असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी क्षीरसागरांची समजूत काढत नाराजी दूर केली होती. त्यामुळे क्षीरसागरांनी जाधवांचा प्रचार केला.

काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटलांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांना राष्ट्रवादीकडून अजित पवारांची प्रचारात साथ मिळाली आणि भाजप उमेदवार असलेल्या सत्यजित कदमांचा पराभव झाला. मात्र पहिल्यांदाच या मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या भाजपने मिळवलेल्या मतांची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

अंधेरी पूर्व मतदारसंघ:

या मतदारसंघाचे आमदार असलेल्या रमेश लटकेंचे निधन झाले. त्यामुळे इथे पोटनिवडनुक जाहिर झाली. या पोटनिवडणुकीआधी शिवसेनेत अभूतपूर्व अशी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली.

त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले गेले. शिवसेना पक्ष नक्की कोणाचा यावर देखील ठाकरे आणि शिंदे कोर्टात गेले. कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपविले. पुढे,निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत दोन्ही गटांना मशाल आणि ढाल तलवार हे चिन्ह दिले.

अगदी ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यासाठीही ठाकरे गटाला कोर्टात जावे लागले होते. कोर्टाने आदेश दिल्यांनतर बीएमसीला लटकेंचा राजीनामा मंजूर करावा लागला. शिंदे गट आपला उमेदवार देण्यासाठी आग्रही असताना भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. वातावरण आपल्या बाजूने जात असल्याचे जाणवताच भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे ऋतुजा लटकेंचा आमदारकीचा मार्ग सोपा झाला.

आता पाहुयात पुण्यातील मतदारसंघाची स्थिती:

कसबा-पेठ मतदारसंघ:

या मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले, आता त्या जागेवर निवडणूक जाहीर झाली आहे. २०१९ला झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मुक्त टिळक यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा पराभव करत विधानसभेत प्रवेश केला होता.

टिळक यांनी तेव्हा ७५,४९२ मते घेत त्या तब्बल २८,००० च्या मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या. मात्र, काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीत काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू असे वक्तव्य केले होते, यावर अजित पवारांनी नाराजी दर्शविली होती.

त्यामुळे आता महाविकास आघाडी ही पोटनिवडणूक लढणार का? आणि लढायचेच असेल तर ही जागा काँग्रेसकडे जाणार की राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार हे पाहावे लागेल.

चिंचवड मतदारसंघ:

या मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात देखील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. नुकतीच त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

लक्ष्मण जगतापांनी या मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक साधली होती. २००९ साली शेकापच्या पाठिंब्यावर तर २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून त्यांनी निवडणूक जिंकली होती. २०१९च्या निवडणुकीत जगतापांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार असलेल्या कलाटे यांचा ३८,४९८ मतांनी पराभव केला होता.

महाविकास आघाडीच्या काळात अत्यंत अग्रेसिव्हली पोटनिवडणुका लढविणाऱ्या भाजपचा महाविकास आघाडी वचपा काढणार की, महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे पोटनिवडणूक बिनविरोध पार पडणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *