Sunday, September 25, 2022
Homeब-बातम्यांचाबच्चू कडू यांना संताप अनावर,कर्मचाऱ्याच्या थेट कानशीलात!

बच्चू कडू यांना संताप अनावर,कर्मचाऱ्याच्या थेट कानशीलात!

अकोला: राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा आक्रमकपणा सोडलेला नाही. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते थेट दिल्लीच्या सीमेवर धडकले होते. याशिवाय अनेक प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेची आंदोलनेही होत असतात. आज त्यांचा हाच आक्रमकपणा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहायला मिळाला. कडू यांचा रुद्रावतार पाहून तिथे सगळेच हादरले.
अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एका घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. येथे रुग्णांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पालकमंत्री व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तिथे धडक देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी एका कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कडू यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली.
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू काल सोमवारी जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक आटोपल्यानंतर बच्चू कडू जिल्हा रूग्णालयात तेथील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गेले. जिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांना निकृष्ट जेवण मिळत असल्याचे व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी ‘व्हायरल’ झाले होते. त्यामुळे पालकमंत्र्यांनी थेट रूग्णालयातील मेसमध्ये जात त्याची तपासणी केली. रूग्णालयातील मेसची जबाबदारी साहेबराव कुळमेथे या कंत्राटदाराकडे आहे. तर याच मेसमध्ये सुनिल मोरे हा कंत्राटी स्वयंपाकी आहे. यावेळी बच्चू कडू यांनी दररोज तूर आणि मूगदाळ किती लागते असा प्रश्न मेसचे प्रमुख कुळमेथे यांना विचारल्यावर त्यांनी २३ किलो असं उत्तर दिलं. हाच प्रश्न नंतर पालकमंत्र्यांनी जेवण बनवणारे स्वयंपाकी सुनिल मोरे यांना विचारल्यावर त्यांनी आठ ते दहा किलो असं उत्तर दिलं. यानंतर डाळींच्या एका दिवशी १२-१३ किलोचा अपहार होत असल्याचं कडू यांच्या लक्षात आल्यानं त्यांचा पारा चढला अन् त्यांनी थेट स्वयंपाकी सुनिल मोरे याच्या कानशीलात लगावली. पालकमंत्र्यांच्या या रूद्रावतारानं मोरेसह उपस्थित सर्वच स्तब्ध होऊन गेलेत.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी
जिल्हा रूग्णालयात कोविड रुग्णांसाठी आलेल्या धान्याची गेल्या आठ महिन्यांपासून नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काल पालकमंत्री मेसमध्ये गेल्यावर त्यांना आणखी एक बाब लक्षात आली. येथील नोंदवहीमध्ये महिनाभराच्या धान्याची मागणी करण्यात आली. मात्र, संबंधित पुरवठादाराकडून फक्त आठ दिवसाचेच धान्य पुरविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची चौकशी कडू यांनी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी निलेश अपार यांच्याकडे सोपविली आहे. या प्रकरणात निलंबनाची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments