| |

या मराठी महिलेने भारतातल्या पहिल्या स्त्री-संपादिका होण्याचा मान मिळवला…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

तो काळ होता १९०६ चा, जेव्हा तानुबाई बिर्जे यांनी कृष्णाजी भालेकर यांनी सुरू केलेल्या दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक पद हाती घेतलं आणि त्या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या पहिल्या स्त्री संपादिका ठरल्या. पत्रकारितेच्या इतिहासामध्ये तानुबाईंना महाराष्ट्रात फारसे कोणी ओळखत नाही ही खूप मोठी खंत आहे. संपादिका तानुबाई बिर्जे यांच्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा पगडा होता त्यामुळे त्या त्यांच्या अग्रलेखातून सामाजिक विषमतेवर परखडपणे व्यक्त व्हायच्या. ते त्यांच्या अग्रलेखात नवनवीन विषयाला हात घालायच्या. विसाव्या शतकात एखादी स्त्री, लोकप्रिय वृत्तपत्राची संपादिका म्हणून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवते ही खूप मोठी आणि ऐतिहासिक बाब आहे. त्या खास करून समाज प्रबोधनावर लक्ष देत असायच्या. सत्यशोधक चळवळीतून आलेले ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र सृष्टीच्या इतिहासामध्ये नेहमीच दुर्लक्षित राहिले.

‘दीनबंधू’चे पहिले संस्थापक-संपादक कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या या वृत्तपत्राचे नंतरच्या काळात संपादन तानुबाई बिर्जे यांनी उत्तम रित्या केलं. महात्मा फुले यांचे सहकारी देवराव ठोसर यांच्या कन्या तानुबाई यांचा जन्म १८७० मध्ये पुण्यात झाला. सावित्रीबाई आणि महात्मा फुले हे दोघेही तानुबाईला आपली मानसकन्या मानायचे. तानूबाईंचं शिक्षण महात्मा फुले यांच्या शाळेत झालं. त्यांचा विवाह पुण्यामधील वासुदेव लिंबाजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने झाला.

कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीमुळे बंद पडलं होतं. त्यानंतर १८८० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबई मध्येच पुन्हा सुरू केलं. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये १८९४ ते १९०५ अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून काम केलं आणि नोकरीचा राजीनामा देऊन दीनबंधू ची १८९७ मध्ये जबाबदारी घेतली. १९०६ मध्ये बिर्जे यांचा प्लेगच्या साथीने मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा दीनबंधु वृत्तपत्र बंद पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पतीच्या निधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले आणि ‘दीनबंधू’ चालवायला घेतले. आणि अशा पद्धतीने त्यांनी भारतातल्या पहिल्या संपादिका बनण्याचा लौकिक मिळवला. परंतु भारतातीलच नव्हे तर जगातील त्या पहिल्या महिला संपादक असाव्यात असा निष्कर्ष सध्या काढला जात आहे.

तानुबाईंनी दीनबंधू मधून सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर भर दिला. समाजात सामाजिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वचने त्या दीनबंधू मध्ये छापून आणायच्या. तसेच चळवळीच्या बातम्या, बहुजनांच्या सर्वांगीण विकासासाठी, शिक्षणाच्या अनुषंगाने त्या विचार मांडायच्या. “भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासन प्रणाली अमलात आणण्यासाठी हिंदुस्तान त्यासाठी लायक आहे का?” असा प्रश्न उपस्थित करून अभ्यासू लेखमाला प्रसिद्ध केली गेली होती. त्यांच्या या अग्रलेखाच्या मांडणी वरून तानूबाईंच्या अभ्यासाची आणि प्रतिभेची झेप किती मोठी होती याची कल्पना येते. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण विषय त्या हाताळत असत म्हणून त्या चर्चेत असायच्या.

२७ जुलै १९१२ च्या अंकातील ‘मुंबई भागातील लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज’ ही तानूबाईंचे आणखी एक असाधारण असे राजकीय ऐतिहासिक आणि परखड असे संपादकिय होते. त्यांनी त्यात स्पष्ट केले होते की, ‘कायदे कौन्सिलात बहुजन समाजाच्या हिताविषयी अनास्था दिसून येत आहे. या अनास्थेचे कारणही जवळपास आहे. ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल या मराठी म्हणी प्रमाणेच, बहुजन समाजाच्या समस्यांनी लोकनियुक्त सरकारी सभासदांच्या पोटात दुखत नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यातला भेदाभेद त्यामुळे या समाजाला राजकीय आर्थिक अस्तित्वच नाही हेच समोर येते.

पांढरपेशा आणि श्रीमंत लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या चालीरीती व आचार-विचारांमध्ये प्रचंड अंतर आहे त्यामुळे सरकारला या समाजाचे दुःख ऐकायलाच जात नाही, त्यामुळे या सरकारपाशी  मुक्या समाजाचे पोट दुखत आहे म्हणून ओवा मागावा तरी कसा हा मोठाच प्रश्न समोर आहे. याचे कारण काय तर, ‘तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नाही, नये नेत्रांजळ, नाही अंतरी कळवळा.’ अशा शब्दांमध्ये तानुबाई ह्या निर्भयतेने आणि परखडपणे तिखट शब्दांमध्ये आपल्या अग्रलेखाद्वारे  विषमतेवर प्रहार करायच्या. तर अशाप्रकारे तानुबाई यांची सामाजिक जाणीव बहुजनांच्या विकासासाठीची तळमळ आणि देशातील सामाजिक आर्थिक सुधारणांसाठी वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याच्या कामाची पद्धत पाहून लक्षात येते की त्या बाईची हिंमत आणि ध्येये किती पराकोटीची होती. अशा यशस्वी, सक्षम,परखड संपादिका म्हणून त्यांचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात मात्र नक्कीच यापुढे लक्षात ठेवले जाईल.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *