आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे बिल क्लिंटनला भेटले…
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आजपर्यंतच्या राजकीय घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. ओघवती लेखणी, प्रभावी वक्तृत्व आणि तितकाच दांडगा आत्मविश्वास म्हणजे मधुकर भावे! त्यांची लिखाणशैली आणि कार्यपद्धती पाहता आजच्या पत्रकारांनी निर्भीडपणे, नि:स्वार्थपणे सातत्याने लिखाण करण्याची प्रेरणा मधुकर भावे यांच्याकडून घ्यावी असे म्हणले जाते. त्यांच्या लेखणी आणि अपार कष्टाने ते पत्रकारितेतील एक यशस्वी व्यक्ती नक्कीच ठरले आहेत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनापासून सुरू झालेली भावे यांची पत्रकारिता गेली बरीच वर्षे अव्याहतपणे सुरूच आहे. महाराष्ट्राच्या गेल्या पंचावन्न वर्षाच्या राजकारणाचा चालता-बोलता इतिहास म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि निवडणुकीचे अनेक किस्से, प्रसंग आणि घटना आपल्यापर्यंत पोहचतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते गोवामुक्ती लढ्यापर्यंत आणि १९७२ सालच्या दुष्काळापासून ते गिरणी कामगारांच्या लढय़ापर्यंतचे सर्व संदर्भ तारीख-वारासह ते आपल्याला व्याख्यानात, मुलाखतीत आणि लेखात दवत असतात. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या आयुष्यात काही सुखवाह प्रसंग आले आहेत.
प्रसंग २००५ मधला आहे, अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष बिल क्लिंटन २००४ साली अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने भारताच्या दौऱ्यावर आले होते. २००५ साली त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर ते पुन्हा एकदा भारत भेटीला आले. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच ‘सिल्वर ओक’ला क्लिंटन यांना सकाळच्या नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष असल्यामुळे सुरक्षाव्यवस्था भरपूर होती. शिवाय शरद पवार यांचे घर अमेरिकन कौन्सीलेटच्या समोर होते. आदल्या दिवशी रात्री शरद पवार यांच्या कार्यालयातून मधुकर भावे यांना फोन आला. आणि सांगण्यात आले की, तुम्हाला पवार साहेब बोलावत आहेत. पवार साहेबांनी मधुकर भावे यांना म्हणाले, ‘उद्या सकाळी दहा वाजता माझ्या घरी ये बिल क्लिंटन यांना चहासाठी आमंत्रित केले आहे’ असे म्हणून आमंत्रित केले.
मधुकर भावे सांगतात, ‘शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर जेमतेम पन्नास लोक बसू शकतील इतका साधा पेंडॉल टाकला होता.’ मधुकर भावे तिथे पोहोचले आणि जाताना पेडर रोड वरून एका बऱ्यापैकी फुलांचा गुच्छ घेतला. अमेरिकेच्या माजी अध्यक्षाला भेटताना सुंदर फुले द्यावी ही त्यांची कल्पना होती. शरद पवार यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांनी आडवून फुले हातातून काढून घेतली. समोरच शरद पवार उभे होते त्यांनी टाळी वाजवून खुणेने रक्षकाला सांगितले की, ‘फुले घेऊन त्यांना येऊ द्या.’ मग मधुकर भावे हातात फुलांचा गुच्छ घेऊन घरात प्रवेश करतात. त्या पन्नास लोकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, मंत्रीमंडळाचे जवळजवळ सर्व सदस्य मुंबईचे महापौर मुंबईचे शेरीफ, उद्योगपती रतन टाटा, दिलीप पिरामल, अजित गुलाबचंद, आदित्य बिर्ला, मुकेश अंबानी आदि सगळी दिग्गज होते.
भावे सांगतात की, “कसलेही पद नसलेला त्याठिकाणी सर्वात लहान असलेला माणूस मीच होतो. सुरक्षेच्या कारणाने कोणालाही गुच्छ द्यायला परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु शरद पवार यांनी मला गुच्छ घेऊन चक्क जवळ बोलावले. गुच्छ क्लिंटन यांना स्वतः मी द्यावा असे त्यांनी मला सांगितले. एवढेच नव्हे तर क्लिंटन यांना माझी ओळखही करून दिली”.
ते पुढे म्हणतात कि, “क्लिंटन यांची भेट झाली गुच्छ दिला त्या दिवशी मी विचार करत होतो की, पवार यांच्यावर मी अनेक वेळा टीका केली असतानाही माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला एवढ्या दिग्गज लोकांमध्ये आमंत्रित करून पवार साहेबांनी का बोलावले असेल? आयुष्यात ऋणानुबंधाच्या गाठी कुठेतरी असतातच. त्यापैकीच एक ही गाठ होती, असे मला नेहमी वाटत राहते. माझे जाहीरपणे जितके सन्मान झाले असतील त्यात क्लिंटन यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी माझी आठवणीने बोलावणे आणि आदराने वागवणे हा काही कमी सन्मान आहे का?”