दीड कोटींची सोन्याची पुरातन नाणी सापडली पण ‘दैव देते आणि कर्म नेते’
वाटपाच्या वादातून समोर आला प्रकरण
पिंपरी: दैव देते आणि कर्म नेते असा काहीसा प्रकार पिंपरी चिंचवड येथील चिखली येथे दोन मजुरांसोबत घडला. बांधकामाचे खोदकाम करतांना दोन मजुरांना ३०० वर्षांपूर्वीची २१६ सोन्याची नाणी आणि ५२५ ग्रॅम वजनाचा कांस्य धातूचा तांब्या सापडला. मात्र, त्यानंतर वाटपावरून झालेल्या वादातून ही गोष्ट बाहेर आली. त्यांच्याकडून ती जप्त करण्यात आली आहे.
मुबारक शेख आणि इरफान शेख हे दोघेही परभणी येथील असून कामानिम्मित पिंपरीत आले होते. ते पिंपरी परिसरात एका नवीन घराच्या बांधकामासाठी पाया खोदताना त्यांना ३०० वर्षांपूर्वीची २१६ सोन्याची नाणी आणि ५२५ ग्रॅम वजनाचा कांस्य धातूचा तांब्या मिळाला होता. त्याची बाजारातील किमत दीड कोटींपेक्षा जास्त आहे. मुबारक शेख यांनी याबाबत जावई सद्दाम सालार पठाण यांना दिली.
त्यानंतर हा नाण्याच्या वाटपावरून वाद झाला आणि पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. चिखली-नेहरूनगर येथे राहणाऱ्या सद्दाम सालार खां पठाण याच्याकडे इतिहासकालीन सोन्याची नाणी असून त्यांनी ती बेकायदेशीरपणे स्वतःकडे ठेवली आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. हे समजताच पोलिसांनी नेहरूनगर येथे संबंधीत व्यक्तीच्या घरात छापा मारला. पुरातत्व विभागाला कोणतीही माहिती न देता बेकायदेशीर रित्या स्वतःकडेच ठेवली. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कारवाई करून ३०० वर्षांपूर्वीची २१६ सोन्याची नाणी आणि ५२५ ग्रॅम वजनाचा कांस्य धातूचा तांब्या हस्तगत केलाय. ही नाणी आणि तांब्या पोलिसांनी पुरातत्व विभागाकडे सुपूर्त केलाय.
खोदकामात सापडलेली इतिहासकालीन नाणी सन १७२० ते १७५० या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहमद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आलंय.