…आणि २४ तासात बहादुरशाह हिंदुस्तानचा सम्राट बनला
हिंदुस्तानच्या इतिहासातील १८५७ च्या उठावाचे इतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणतीही नसेल असे वाटते. १८५७ सालापासून आजतागायत या घटनेबद्दल हिंदी इतिहासकार, विचारवंत, नेते, इंग्रज राज्यकर्ते, परकीय इतिहासकार अशा अनेकांनी आपापली मते सांगितलेली आहेत. काही जणांनी या घटनेत शिपायांचे बंड असे म्हटले आहे. तर काही जणांनी या घटनेचा ‘हिंदी लोकांच्या स्वातंत्र्याचे युद्ध’ म्हणून गौरव केला आहे. १८५७ चा उठाव प्रथम लष्करातील हिंदी शिपायांनी केला, याचे कारण त्यांच्यामध्ये कंपनी सरकारविरुद्ध असंतोष खदखदत होता. हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. याउलट गोऱ्या शिपायांची प्रतिष्ठा व मिजास राखली जायची. हिंदी शिपायांपेक्षा गोऱ्या शिपायांना पगार अधिक असायचा. तसेच एखाद्या हिंदी शिपायाने धर्मांतर करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला की त्याला बढती ठरलेली असायची. हा प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.
कोणत्याही खदखदत्या असंतोषाचा उद्रेक होण्यासाठी निमित्त हवे असते. असे निमित्त म्हणजे त्या उद्रेकाचे तात्कालिक कारण असते. हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात होती त्यांना गाईची वा डुकराची चरबी लावलेली असते ही बातमी १८५७ च्या उठावाचे तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असत. सहाजिकच त्या वरील चरबी शिपायांचा तोंडात जात असे. गाईला हिंदू पवित्र मानतात तर मुसलमान डुकराला अपवित्र मानतात. दोन्ही जनावरांच्या चरबी या दोन्ही धर्मीयांना वेगवेगळ्या अर्थाने निषिद्ध होत्या. ही बातमी प्रथम कलकत्त्याच्या फौजेत पसरली व नंतर एखाद्या जागी प्रमाणे तिचा उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र प्रसार झाला.
हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. आपला धर्म बुडविण्याचा इंग्रजांचा हा डाव आहे असे त्यांना वाटू लागले. त्यांनी याचा जाब आपल्या गोऱ्या अधिकाऱ्यांना विचारला. तेव्हा ‘ही गोष्ट साफ खोटी’ असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. परंतु, शिपायांचा त्यावर विश्वास बसला नाही. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १०मे १८५७ रोजी मीरठ येथील छावणीत झाला. शिपायांचा बंडाची पहिली ठिणगी तिथे पडली.
शनिवार ९ मे १८५७ या दिवशी इंग्रज अधिकाऱ्यांनी दिलेली काडतुसे घेण्यास मीरठ येथील छावणीतील ८५ शिपायांनी नकार दिला. लष्करी हुकुमाचा भंग केल्याबद्दल त्या शिपायांना प्रत्येकी दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. त्याकाळी सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या कैद्यांना पायात बेड्या ठोकण्यात यायच्या. दुसऱ्या दिवशी या कैद्यांच्या पायात बेड्या ठोकण्याचे काम इतर सर्व शिपायांच्या समोर सुरू करण्यात आले. ते ८५ कैदी गोऱ्या अधिकार्यांकडे दयेची याचना करू लागले. तथापि त्यांना दया दाखवण्यात आली नाही. तेव्हा या कैद्यांनी समोर उभ्या असलेल्या आपल्या शिपाई बंधूंना, “तुमचे सोबती शिक्षेला बळी पडत असताना तुम्ही ना मर्दासारखे उभे का?” असा सवाल केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक १० मे १८५७ रोजी सायंकाळी यश शिपाई बंधूंनी बंडाचा झेंडा उभारला. इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले आणि तुरुंगाकडे धाव घेऊन तो फोडून शिपाई कैद्यांना मुक्त केले.
‘कंपनी सरकारचे राज्य खलास झाले’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. छावणीवर आता बंडवाल्यांचे वर्चस्व निर्माण झाले ही बातमी मीरठ गावात पसरताच गुंडांनी लुटालूट सुरू केली. आपण बंड केले खरे पण पुढे काय करायचे यावर बंडवाले विचार करू लागले. शेवटी दिल्लीकडे कूच करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एकेकाळची हिंदुस्थानची ही वैभवशाली राजधानी अजूनही त्यांना आकृष्ट करत होती. नामधारी का असेना पण तेथे मोगल बादशहा बहादूरशहा अद्यापि जिवंत होता.
मीरठ पासून दिल्ली तीस मैल अंतरावर आहे ते अंतर काटून बंडवाले शिपाई दुसर्या दिवशी दिल्लीस आले. बहादुरशहा यास सिंहासनावर बसून त्याची राजवट सुरू झाल्याची घोषणा त्यांना करायची होती. बहादुरशहा नावाचा बादशहा बनला होता. एकेकाळचे त्याचा पूर्वजांचे वैभवशाली साम्राज्य व बलाढ्य सत्ता या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या होत्या. इंग्रजांच्या पूर्ण वर्चस्वाखाली जाऊन तो त्यांचे बाहुले बनला होता. अशा परिस्थितीत बंडवाल्यांना साथ देणे त्यांना धोक्याचे वाटत होते. बंडवाल्यांचे पारडे जड होत होते. शेवटी त्यांच्या दबावाखाली त्याने सिंहासनावर बसण्याचे व हिंदुस्तानचा बादशहा होण्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे राज्याभिषेकाचा समारंभही घडून आला.
यानंतर दिल्लीतील दारूगोळ्याच्या कोठारावरचा ताबा घेण्यासाठी बंडवाल्यांनी तिकडे धाव घेतली पण कोठारास आग लावून प्रचंड मोठा स्फोट घडवून आणला. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. हे सर्व घडत असताना, प्रसंगसावधानता राखून इंग्रजांनी दिल्लीतील शिपायांच्या बंडाची बातमी तारा यंत्राच्या सहाय्याने उत्तर हिंदुस्थानातील प्रमुख शहरामधील इंग्रज अधिकाऱ्यांना पोहचवली होती. इंग्रजी आकडे असलेल्या या शास्त्रीय साधनाचा त्यांना खूप फायदा झाला होता. जी बंडाची बातमी कळवण्यासाठी पूर्वीच्या काळी कित्येक आठवडे लागले असते तेथे ती काही क्षणात जाऊन पोहोचली. तरीही इकडे बंड यशस्वी झाले! अशा तर्हेने २४ तासात दिल्ली बंडवाल्यांच्या हाती आली! कालपर्यंत गुलाम असलेला बहादूरशहाला त्यांनी हिंदुस्तानचा सम्राट बनवला. बंड करणे सोपे असते पण यशस्वी करणे अवघड असते.