‘और कितना फेकोंगे मोदी जी…?’ नाना पटोलेंचं टीकास्त्र!
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी पोहोचले असून दोन दिवसांचा हा दौरा आहे. ढाका इथं शुक्रवारी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून देशात राजकीय टीका-टिप्पणीला जोर चढला आहे. मोदी यांच्या या भाषणाचं ‘राजकीय’ विश्लेषण सध्या भारतात सुरू आहे.
दरम्यान ढाका मधल्या एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असं सांगितलं. विरोधकांनी मोदींच्या या दाव्याची खिल्ली उडवली आहे. खरंच, मोदी हे बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते का, यावरून चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर मोदींना अजून किती फेकणार अशी विचारणा केली आहे.
‘मोदीजी, आणखी किती फेकणार? आमच्या मराठीत एक म्हण आहे, हद्द झाली राव!,’ असं पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक शब्दही आपल्या तोंडातून निघाला नाही आणि स्वातंत्र्याच्या बाता मारण्यासाठी बांगलादेशात जाता? शेतकऱ्यांना आपण ‘आंदोलनजीवी’ म्हणाला होतात. मग आपण कोण आहात, ‘ढोंगजीवी’?,’ असा चिमटाही पटोले यांनी काढला आहे. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत.
और कितना फेकोंगे मोदी जी…..
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 26, 2021
हमारे मराठी मे एक लाईन है…. हद झाली राव..
किसान आंदोलन कर कर एक शब्द तक आपके मुह से निकला नही…. और आझादी की बात करने बांग्लादेश जाते हो…… किसानो को आंदोलनजीवी आपने कहा था…. आप कोण हुए अब ढोंगीजीवी. https://t.co/H8g3AQk47C
काय म्हटले पंतप्रधान नरेंद्र मोदी
“मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
दरम्यान भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी भारतीय उपखंडातील दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी एकजूट दाखवण्याची आणि जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात केलं.