आणि स्मिताने चित्रपटात येण्याचे ठरविले…

and-smitha-decided-to-come-to-the-movie
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

स्मिता कॉलेजमध्ये असतांनाची ची गोष्ट होती. तेव्हा ती पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज हॉस्टेल मध्ये राहायची. एक दिवस ती तिच्या मैत्रिणी बरोबर डेक्कन जिमखाण्याच्या जवळच्याच एका हॉटेलमध्ये बसली होती. तेवढ्यात तिच्या मैत्रिणीचा एक मित्र तिथे टेबलजवळ आला आणि गप्पा मारायला लागला. स्मिता कडे पाहून तो चटकन बोलला, ” तू सिनेमात काम का करत नाहीस? तू अगदी जया भादुरी सारखी दिसतेस” तो मुलगा स्वतः फिल्म इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी होता. त्याचं बोलणं ऐकून स्मिता विचारात पडली. आणि कसलाही मागचा पुढचा विचार न करता दुसर्‍याच दिवशी ती फिल्म इन्स्टिट्यूटला गेली. आणि लगेचच तिथे तिचं फोटोसेशन सुद्धा झालं. जेंव्हा हे तिच्या आईला कळलं तेव्हा त्यांनी स्मिताला दम भरला, सिनेमा-सृष्टीत जायचं वगैरे हे डोक्यातून काढून टाक आणि अभ्यास कर अशा शब्दात स्मिताला रागवल्या आणि लागलीच स्मिताने सिनेमात काम करायचा विचारच सोडून दिला.

काही काही वर्षानंतर स्मिता पुण्याहून मुंबईला आली. ध्यानी-मनी नसताना ती मुंबई दूरदर्शन-मध्ये वृत्तनिवेदिका म्हणून नोकरीला लागली. तिचं सावळे आणि तजेलदार सौंदर्य, टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरचा प्रसन्न स्मित आणि बातम्या सांगण्याची सहजता ह्या साऱ्या गोष्टी आकर्षक परिणामकारक होत्या. बातम्या सांगताना स्मिताचे व्यक्तिमत्व फारसे प्रभावी जरी वाटत नसेल तरीही याच दूरदर्शनच्या छोट्या पडद्याने स्मिताला नकळतपणे चित्रपटसृष्टीत नेऊन पोहोचवलं.

तिचा पहिला चित्रपट म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटच्या अरुण खोपकर यांची डिप्लोमा फिल्म ‘तीव्र मध्यम’ हा होता. श्याम बेनेगलचा चित्रपट ‘चरणदास चोर’ मधली राणी, तसेच ‘राजा शिवछत्रपती’ मधील सईबाई साकारली. अशारीतीने तिचं चित्रपटसृष्टीतलं करियर सुरू झालं. श्याम बेनेगल च्या मंथन मधल्या भूमिकेसाठी स्मिताला फिल्म वर्ल्डचा आणि बंगाल जर्नलिस्ट असोसिएशनचा ‘बेस्ट ॲक्ट्रेस-नॅशनल अवॉर्ड’ आणि फिल्म-फेअरचा ‘बेस्ट ॲक्ट्रेस-स्पेशल अवॉर्ड’ मिळाला होता.

करियरच्या सुरुवातीलाच स्मिता एक ‘अभिनेत्री’ म्हणून सातासमुद्रापलीकडे जाऊन पोहोचली होती. ‘निशान्त’ ‘मंथन’ आणि ‘भूमिका’ या तिन्ही चित्रपट निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवले गेले होते. ‘गमन’, ‘जैत रे जैत’,’चक्र’ या चित्रपटांमधील  तिच्या  वजनदार अभिनयाने तिने  चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. तसेच तिने ‘भारत-दर्शन’ सारखे सांस्कृतिक कार्यक्रम देखील केलेत. ‘बीज’, ‘वासनाकांड’ तसेच ‘छिन्न’ सारखे व्यावसायिक नाटक देखील केले. त्यामुळे तिला थिएटरचा देखील अनुभव मिळाला. नाटक आणि चित्रपट अशी ओढाताण होतं असल्यामुळे तिने अखेर नाटक सोडलं आणि पूर्णवेळ चित्रपटांकडे वळाली. ‘चक्र’ चित्रपटासाठी तिला पुन्हा एकदा बेस्ट ‘एक्ट्रेस नॅशनल अवॉर्ड’ आणि वेस्ट बंगाल जर्नलिस्ट असोसिएशनतर्फे बेस्ट एक्ट्रेसचं ‘दिशारी’ अवॉर्ड मिळाला.

‘जैत रे जैत’ साठी स्मिताला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा बहुमान प्राप्त झाला तर ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’ या चित्रपटातील छोट्याशाच भूमिकेसाठी तिला कलकत्त्याच्या रवींद्र सदनचा बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला. ऑफ बीट आणि कमर्शियल अशा दोन्ही चित्रपटांमध्ये स्मिताने सुंदररीत्या बॅलेन्स साधला आहे हे तिचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील ‘अभिनेत्री’ कधीही कुठल्याही भाषेत अडकून पडली नाही. तिची अभिनय शैली अगदी सहज आणि नैसर्गिक वाटायची. तिचा ‘उंबरठा’ चित्रपट विसरणे अशक्यच! उंबरठा मधील भूमिकेसाठी स्मिता ला ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशनचा बेस्ट एक्ट्रेस अवॉर्ड मिळाला होता. तसेच ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ ‘जायंटस अवॉर्ड’, ‘आशिर्वाद अवॉर्ड’ यासारखी बरीच असंख्य अवॉर्डस स्मिताला मिळाली होती.

२६ जानेवारी १९८५ मध्ये भारत सरकारने स्मिताचा ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. मॉन्ट्रियल येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करण्याचा मान स्मिताला मिळाला. १९८५ मध्ये जुलै महिन्यात नैरोबी येथे भरलेल्या जागतिक महिला परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील स्मिताला मिळाली होती. इतकच नव्हे तर कॉस्टा गॅव्हराससारख्या जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाने फ्रान्समध्ये, पॅरीस आणि ला रोशेल अशा दोन ठिकाणी खास स्मिताच्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित केले होते. अशा चित्रपट महोत्सव आयोजित केलं जाण्याचे भाग्य फक्त स्मिताला मिळालं. वाजतागायत आशियातील ती पहिली अभिनेत्री ठरली.

तसं पाहायला गेलं तर स्मिताने मराठीपेक्षा हिंदी चित्रपटात अधिक काम केलं होतं. परंतु तिला मी मराठी असण्याचा विसर कधीच पडला नव्हता. प्रत्येक मराठी प्रेक्षकांना, चाहत्यांना ती आपलीच वाटायची. तिच्याशी प्रत्यक्ष ओळख नसणाऱ्यांना देखील ती जवळची वाटायची. ती हिंदी चित्रपट सृष्टीत देखील अत्युच्च शिखरावर असूनदेखील, तिच्यात आणि प्रेक्षकांमध्ये कधीच अंतर निर्माण झाले नाही किंबहुना तिने होऊच दिले नाही. उलट प्रत्येक अवॉर्ड बरोबर तिची आणि प्रेक्षकांची जवळीक वाढत गेली. स्मिताचे करियर जरी आपल्याला यशस्वी दिसत असेल तरीही तिच्या खाजगी आयुष्यात मात्र अनेक वादळे उठली. त्या सर्व संकटांना अडचणींना मात करून ती कायम पुढे जात राहिली. तिच्या करिअरच्या अगदी अत्युच्च शिखरावर असताना ती अचानक आपल्या सर्वांना सोडून गेली. ती अजून जगली असती तर तिने आणखी किती मान सन्मान मिळवले असते याची गणना देखील नसती. एवढ्या लहान वयात ती मोठ्या ताकदीची अभिनेत्री बनली होती. आंतरराष्ट्रीय कीर्तीची अभिनेत्री ही अस्सल मराठी मातीतून जन्माला आली याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *