…आणि महाडमध्ये ऐतिहासिक सामाजिक क्रांती उदयाला आली!

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

“चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही-आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही-आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरीता तर नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरीताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे”. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हणत तळ्याचे पाणी हातात घेत “चवदार तळ्याचा सत्याग्रह” पार पाडत एक ऐतिहासिक सामाजिक क्रांती घडवली. तो दिवस म्हणजे २० मार्च १९२७ म्हणजेच आजचा दिवस होय. त्यानंतर अनेक वर्षं हा दिवस ‘समता दिन’ तसेच ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून साजरा केला जातो.

कोकणात असलेले महाड हेच शहर सत्याग्रहासाठी निवडले जाण्याचे कारण काय होते तर, तेथील उच्च जातीय हिंदूंनी हे सत्याग्रहाचे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकाऱ्याची तयारी दाखवली होती. सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे आणि अनंत विनायक चित्रे तसेच यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाडच्या सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते मदत करीत होते.

१९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी महाड नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती आणि सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. त्या सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे पोहचले. आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्यानंतर बघता-बघता जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले. त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी उपस्थित होते. त्यां सर्वांनी तळ्याचे पाणी प्याले. त्यातील महार जातींचे पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते. त्याकाळी महार जातीच्या पुरुषांचे ते चिन्ह समजले जात होते.

महाडच्या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग देखिल लक्षणीयरित्या होता. आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे/चिन्हे आपल्या शरीरावर बाळगू नये असे आवाहन केले होते. तत्कालिक स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पुर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. तसेच त्यांनी महार पुरुषांना हातात काठी ठेवण्याची किंवा असले जातीनिहाय चिन्हे बाळगण्याची आवश्यकता नसल्याची सूचना केली होती. आंबेडकरांनी केलेल्या आवाहनाची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली होती.

हा सत्याग्रह आटपून चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले. तळ्याजवळ उपस्थित असलेले इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. मात्र त्यानंतर विपरीतच घडले. चवदार तळ्यावरुन सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, “तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव विरेश्वरच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे.” धर्म धोक्यात आला आहे अशी अफ़वा उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवली. धर्मांधतेने तापलेले हिंदूंचे एक टोळके हत्यारे व  लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आले. सभेत जेवायला बसलेल्या  अस्पृश्यांना मारहाण केली.

हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरुन सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आजूबाजूच्या गावांमधून ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवू अशी धमकी पोहोचवली गेली. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी परत पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले. विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध “हिंसा करू नका” असा आदेश दिला होता. त्यामुळे आपल्यावर एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम बाळगला. त्यांच्या अहिंसेचे त्याबद्दल आंबेडकरांनी आणि गांधीजींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते. झालेल्या घटनेवर गांधीजीं व्यक्त होत त्यांनी सत्याग्रहाला पाठिंबा दिला आणि उच्चजातीयांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करुन मोठी चुक केली आहे असे मत त्यांनी यंग इंडियामध्ये प्रकाशित केले होते.

जरी महाडचा सत्याग्रह क्रांतीकारी मार्गाने झाला तरी त्याला असलेला सनातन्यांचा विरोध पाहता तळ्यापासून शोषित समाज अजूनही दूरच होता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणून पुन्हा तिथे अधिवेशन घेऊन आपला समतेचा हक्क मिळवायचाच असा निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा लढा पुन्हा हाती घेतला. पुढे २६ डिसेंबर १९२७ रोजी ‘चवदार तळ्याचे हक्काचे पाणी अस्पृश्य जनतेला मिळावे’ आणि ‘हिंदू धर्मातील विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृतीचे दहन करायचे’ असा कार्यक्रम घेण्यात आला. चवदार तळ्यावर जाऊ नये म्हणून न्यायालयाचा तात्पुरता मनाई हुकूम असल्यामुळे सनातन्यांनी या अधिवेशनाला विरोध केला.

खूप वर्षे संघर्ष करून चवदार तळ्याच्या पाण्याची ही न्यायालयीन लढाई पुढे १७ मार्च १९३७ मध्ये पूर्ण झाली. अस्पृश्यांना आपला हक्क मिळाला. त्यानंतर १९ मार्च १९४० रोजी डॉ. आंबेडकर यांनी महाडमधे १४ वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला होता. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशी महाड नगरपालिका प्रेसिडेंट डॉ. विष्णु नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करुन आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. डॉ. खोडके हे १९३१ पासुनच डॉ. आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा देत आले होते. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अहिंसेच्या धोरणामुळे तसेच संयमी नेतृत्वामुळे हा महाडचा सत्याग्रह शोषित समाजाला आपले अधिकार आणि आपले हक्क यांचे भान देणारा ठरला.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *