Friday, October 7, 2022
HomeZP ते मंत्रालयशून्यातून साम्राज्य उभं करणारा 'लोकनेता'

शून्यातून साम्राज्य उभं करणारा ‘लोकनेता’

एका लहान खेड्यात जन्म घेऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे मूर्तिमंत, उत्साही व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. पतंगराव कदम. खेड्यातील मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये गणित व इंग्रजी शिकवावे, या उद्देशाने त्यांनी सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली. “माझ्या गावातला मॅट्रिक झालेला मी पहिलाच. जेथे एक खडा मारला, तर दहा विद्वानांना लागतो अशा पुण्यात आलो आणि सदाशिव पेठेतल्या एका दहा बाय दहाच्या खोलीत विद्यापीठाची स्थापना केली,’दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम आपला परिचय करून देताना हमखास याच वाक्याने भाषणाला सुरुवात करत.

पतंगराव कदम हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जायचे. यशवंतराव चव्हाण साहेब यांची जन्मभूमी असलेल्या भिलवडी-वांगी मतदारसंघातून १९८५ साली पहिल्यांदा त्यांची आमदार म्हणून निवड झाली आणि त्याच मतदारसंघात सलग दुसऱ्यांदाही आमदार म्हणून निवड झाली. १९९० मध्ये प्रथम राज्याचे शिक्षणमंत्री बनले. १९९२ साली शिक्षण व पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले. पुढे सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे पतंगराव कदम हे अविभाज्य घटक होते.

१९९९ नंतर काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री बदलायची किंवा मुख्यमंत्री निवडीची चर्चा झाली, तेव्हा तेव्हा पतंगराव कदम यांचं नाव नेहमी चर्चेत असायचं. साधारणतः पाच/ सहा वेळा मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव प्रमुख दावेदार म्हणून पुढेही आलं परंतु प्रत्येक वेळेस काहीना काही कारणामुळे त्यांना पद मिळालं नाही. १९९९ च्या निवडणुकीच्या वेळी ते स्पर्धेत होते त्यांच्याच बरोबरीने विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांचंही नाव चर्चेत होतं. २००३ मध्ये राज्यात काँग्रेस सत्तेत असताना, विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करायचं ठरलं तेव्हा पतंगराव आणि रोहिदास पाटील यांची नावे जवळपास ठरणारच अशी चर्चा होती आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.

ते दिल्लीतही जाऊन आले होते. पण त्यावेळीही त्यांना संधी मिळाली नाही कारण सुशीलकुमार शिंदे यांना पद देऊ केलं गेलं होतं. त्यानंतर २००४ मध्ये  पुन्हा पतंगरावांचं नाव चर्चेत आलं. त्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये आल्यावर तर ते मुख्यमंत्री होणार कि काय असे प्रश्न उपस्थित असताना, तेव्हाही पतंगराव कदम यांनी मी स्पर्धेत असल्याचं पत्रकारांना सांगितलं होतं. पत्रकारांशी बोलताना ते नेहमी म्हणायचे की, माझी खूप इच्छा आहे. पण अजून माझा नंबर येत नाही. ही संधी गेली, पुढच्या वेळी पाहू म्हणत म्हणत शेवटी नंतरच्या काळात तब्येतीमुळे किंवा अन्य कारणांमुळे असेल पण ते या स्पर्धेतून स्वतःहून बाजूला झाले होते. त्यांना अनेकवेळा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली.पण हा माणूस खचला नाही. काही नेते मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारल्यावर बोलायला बिचकतात पण साहेब जाहीरपणे आपली मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करायचे.अगदी एखाद्या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित असले तरी ते म्हणायचे,”आता माझाच नंबर आहे.”हा त्यांचा बेधडकपणा लोकांना भावायचा.

पतंगराव कदम राजकीय वर्तुळात दिलदार, पण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. दिल्लीतील वरिष्ठांशीही त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते.  पतंगराव कदम  हे महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री म्हणून पदभार सांभाळला. २००४ मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसनमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बनले. मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले. १९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांच्याकडे वन, मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा आली. सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत. इतकी लांबलचक राजकीय कारकीर्द असताना तसेच काँग्रेसचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते असताना त्यांना मुख्यमंत्री पद का दिलं गेलं नसावं याबद्दल निश्चितच प्रश्न उपस्थित केला जातो.

याविषयी पत्रकार वसंत भोसले हे त्यांच्या एका मुलाखतीत सांगतात, “जेष्ठ नेते म्हणून त्यांचं नाव नेहमी चर्चेत असायचं. पण त्यांचा पाठीराखा गट असा नव्हता. ते कधी लॉबिंग करायचे नाही. ते त्यांना जमलं नाही. सर्वांशी संबध ठेवायचे. लॉबिंग करून दबाव गट करावा, असं त्यांनी कधी केलं नाही. हायकमांडवर त्यांचा फार विश्वास होता. काँग्रेसमध्ये असं होत नसतं, असं त्यांना वाटायचं. त्यांच्यात एक मोकळेढाकळेपणाही होता. लॉबिंगसाठी जे काही करायची तयारी असावी लागते ती त्यांच्यात नव्हती. तसेच तेंव्हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी पतंगराव कदम यांच्यावरच होती. पण पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व मात्र राष्ट्रावादीचं होतं. कदाचित हेही एक कारण असू शकते.”

पतंगराव कदमांचं महाराष्ट्राच्या विकासात मोलाचं योगदान आहे. त्यांनी एसटी पासून सुरू केलेला विकास आज सगळ्यांच्या हृदयात आहे. आता एसटी सुरू केली हे काहीजणांना खूप छोटं काम वाटेल पण ज्यावेळी एसटी नुसती बघायला मिळाली तर माणसं दहाजणांना सांगायची ‘आज मी एसटी पाहिली.’ त्याकाळातील ही गोष्ट आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश: साम्राज्यच निर्माण केले. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य मोठे आहे. एका वेगळ्या प्रकारची दिशा त्यांनी शिक्षणाला दिली. एका छोट्या संस्थेपासून नामवंत विद्यापीठापर्यंतची वाटचाल त्यांनी भारती विद्यापीठाच्या मार्फत करून दाखविली.

आज आपल्याला पतंगराव कदम आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्था दिसतात पण त्यांच्या आयुष्यातील ही स्वप्न त्यांनी त्यांच्या सकारात्मकतेच्या जोरावर पूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला कोणी नाकारलं तर त्याचा राग येण्यापेक्षा त्यातून सकारात्मक घडवण्याची धमक डॉ कदम यांच्यात होती.

त्यांना भारती विद्यापीठाची प्रेस उभी करायची होती मग त्यांनी उद्योग खात्याकडून राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज द्यावे अशी शिफारस मिळवली मात्र त्या बँकेने २५ हजार रुपये कर्ज नाकारले.हा नकार त्यानी नम्रपणे स्वीकारला पण पुढे ज्याला कधीकाळी कर्ज नाकारले होते त्या माणसाने बँकेची स्थापना केली. असा होता हा माणूस. कर्ज नाकारले म्हणून स्वतः बँकेचा संस्थापक होणारा.पतंगराव कदम यांच्याकडून हीच धमक शिकण्यासारखी आहे. 

आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रुपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. ते भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे नुसतेच संस्थापक नसून कुलगुरू देखील होते. दुसरे चिरंजीव अभिजित यांच्या अपघाती मृत्यूमुळे झालेल्या धक्क्यातून स्वतःला सावरत त्यांनी राजकीय आणि शैक्षणिक काम पुढे सुरूच ठेवले आणि कॉंग्रेसशी ते आयुष्याच्या अखेरपर्यंत निष्ठावंत राहिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments