अमृता फडणवीस यांचं गाणं प्रदर्शित, चाहत्यांसह ट्रोलर्सलाही प्रदर्शनाबाबत दिली माहिती
मुंबई: माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचे फॅन फॉलोवर्स खूप आहेत. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अनेक गाणी गायली. त्यांच्या गाण्यांना दरवेळीच चाहत्यांचा ‘उत्तम’ प्रतिसाद असतो. आज महिला दिनाचं औचित्य साधून अमृता फडणवीस खास आपल्या चाहत्यांसाठी एक गाणं घेऊन आल्या आहेत. या गाण्याला त्यांच्या चाहत्या वर्गाचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतोय. कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..असं नाव असणारं हे गीत नाट्य संगीतावर आधारित आहे.
अमृता फडणवीस यांचं संगीत प्रेम सर्वश्रुत आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रमात गाणी गायली आहेत. या आधी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केलं होतं. आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर ते गाणं त्यांनी पोस्ट केलं होतं त्यालाही ‘उत्तम’ प्रतिसाद मिळाला होता. अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित असलेल्या अंधार नावाच्या एका मराठी चित्रपटातील ‘डाव’ हे गाणं, भाऊबीजेच्या निमित्तानं ‘तिला जगू द्या’ ही अमृता फडणवीसांची गाजलेली गाणी. इतकंच काय तर अनेक गाण्यांचे अल्बमही त्यांनी केलेले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एका सिनेमात गाणं गायलं होतं.
अमृता फडणवीस आणि ट्रोलर्स मधलं नातं –
अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम व्यक्त होत असतात. त्यावरून अनेकदा त्या ट्रोल होत असतात. आता तर आपलं गाणं प्रदर्शित होणार हे त्या ट्रोलर्सलाही आवर्जून सांगतात.
भाऊबीजेनिमित्त महिला सक्षमीकरणासंदर्भात त्यांच्या आवाजातील गाण्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यावर सुद्धा त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. त्या गाण्याला अनेकांनी आपली नापसंती दर्शवली होती. त्यात प्रसिद्ध सिने दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा ही समावेश होता. “हिला नको गाऊ द्या” अशी फेसबुक पोस्ट करत दिग्दर्शक महेश टिळेकर त्यांच्यावर टीका केली होती.
अमृता फडणवीस यांना सातत्याने का ट्रोल केले जातं यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी सांगितले की, “कोणत्याही महिला सेलिब्रिटीने सोशल मीडियावर काही पोस्ट केले तर त्यावर नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा येतात. अमृता फडणवीस यांच्या पोस्टवर काही आक्षेपार्ह भाषेत आलेल्या प्रतिक्रियांचा निषेधच केला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर अमृता फडणवीस ज्या पद्धतीने सोशल मीडियावर राजकीय टीका टिप्पणी करत आहेत, त्यानंतर त्यांना ट्रोल केले जाईल हे त्यांनी गृहीत धरले पाहिजे.”