अमरिश पुरी यांची कारकीर्द मराठी नाटकांपासून सुरु झाली होती…

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

“मोगैंबो खुश हुआ” असा डायलॉग ऐकला की डोळ्यासमोर येतो तो चित्रपटातील भयंकर असा खलनायक. त्याचे ते भेदक डोळे, वजनदार असे डायलॉग, आणि त्याच्या भारदस्त आवाजातला दरारा. ऐंशीच्या दशकात याच खलनायकाने म्हणजेच अमरीश पुरीने करण-अर्जून, गदर, नायक, राम-लखन, मिस्टर इंडिया, अंधा कानून, विधाता अश्या तब्बल ४०० हून अधिक चित्रपटात खलनायकाचं काम केलंय. खरं तर इतर अभिनेत्यांप्रमाणे तेही हिरो बनण्यासाठी मुंबईत आले होते. पण त्यांचा चेहरा पाहून कित्येक निर्माते त्यांना नकारत होते. कंटाळून त्यांनी एका विमा कंपनीमध्ये नोकरी करायला सुरवात केली. 

नोकरी दरम्यान त्यांची ओळख उर्मिला दिवेकर यांच्यासोबत झाली. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काहीच वर्षांत म्हणजेच ५ जानेवारी १९५७ ला त्या दोघांनी लग्न केलं. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलीचे नाव नम्रता आहे. नम्रता ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ती कॉस्ट्यूम डिझायनर देखील आहे. तर त्यांचा मुलगा राजीव हा बिझनेसमन आहे.

अमरिश पुरी विमा कंपनीत नोकरी करत असले तरी अभिनयाचा किडा त्यांच्या डोक्यातून काय जात नव्हता. मग त्यांनी पृथ्वी थिएटरमधील नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांच्या अजरामर कारकिर्दीवर नजर टाकली तर ‘मिस्टर इंडिया’ मधील ‘मोगॅम्बो’ असो, वा ‘घातक’मधील ‘शंभू नाथ’ किंवा ‘डीडीएलजी’ मधील ‘बाबूजी’… अमरीश पुरींनी प्रत्येक भूमिका अजरामर केली आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की, अमरीश पुरी यांच्या करिअरची सुरुवात मराठी सिनेमापासून झाली होती. १९६७ सालच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या नाटकावर आधारित सिनेमात अमरीश पुरींनी रेल्वे डब्यात गाणं गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. श्याम बेनेगल, स्मिता पाटील यांच्याबरोबरही त्यांनी अनेक सिनेमे केलेत.

अखेर भरपूर प्रयत्नानंतर वयाच्या ३९ व्या वर्षी अमरीश पुरींनी ‘रेशमा और शेरा’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सुनील दत्त, अमिताभ बच्चन आणि वहिदा रेहमान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘रेशमा और शेरा’ सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले होते. खलनायक म्हणून त्यांनी स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. त्यांनी ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यातही त्यांनी हिंदी प्रमाणेच मराठी, कन्नड, पंजाबी, तेलगू, तामीळ, इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले.

१९८४ साली स्टिव्हन स्पीलबर्ग यांनी ‘इंडियाना जोन्स अँड द टेम्पल ऑफ डूम’ या सिनेमात अमरीश पुरींना ‘मोला राम’ नावाची भूमिका दिली होती. स्पीलबर्ग यांच्या सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी अमरीश पुरी हे एक. ज्यूरासिक पार्क,शिंडलर्स लिस्ट, कॅच मी इफ यू कॅन यांसारख्या हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या स्टीवन स्पीलबर्ग यांनाही अमरीश पुरींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर भुरळ घातली. ‘माझ्या जीवनात मी अनेक चित्रपट पाहिले, मात्र यासारखा दमदार खलनायक मी कधीच नाही पाहिला’, असे विधान स्टीवन स्पीलबर्ग यांनी अमरीश पुरी यांच्याबाबत केलं होतं. स्पीलबर्ग यांच्या सिनेमामुळे परदेशात अमरीश पुरींना ‘मोला राम’ या नावाने ओळखलं जातं. त्यांनी केलेली ही तांत्रिकाची भूमिका तर जगभरात गाजली होती.

अमरीश पुरींनी केवळ व्यावसायिक चित्रपटातच काम केलं नाहीं तर, रिचर्ड अॅटनबरोच्या गांधीमध्ये, गोविंद निहलानींच्या ‘अर्धसत्य’ मध्ये तसेच श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ या चित्रपटातल्या भूमिकांना प्रेक्षक आणि समीक्षकांची दादही मिळाली आहे. अमरीश पुरी यांनी केवळ निगेटिव्ह भूमिका साकारल्या नाहीत. तर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘ताल’, ‘चाची ४२०’, ‘गर्व’, ‘घातक’ या चित्रपटात साकारलेला त्यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. २००५ ला एके दिवशी ते घरात पडले आणि त्यातून त्यांच्या डोक्यात गाठी झाल्या. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचं वयाच्या ७२व्या वर्षी निधन झालं. पण भारतीय प्रेक्षक त्यांना कधीही विसरला नाही, विसरणार नाही. चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका आणि त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. सिनेप्रेमींच्या मनात “मोगैंबो” आजही जिवंत आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *