अमित ठाकरेंना कोरोनाची लागण, लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घरातील इतर सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कळत आहे.
याआधी सुद्धा ऑक्टोबर २०२० मध्ये अमित ठाकरे यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, अमित ठाकरे यांची कोरोनाची चाचणी ही निगेटीव्ह आली होती. व्हायरल फिव्हर झाल्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तर दुसरीकडे मागील आठवड्यात राज ठाकरे यांना सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.