१८ वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी – नाना पटोले

मुंबई: राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केलीये. परंतु वयाची अट शिथिल करून संक्रमणाचा मुख्य भाग असणाऱ्या तरुण वर्गाला लस कधी ? असा प्रश्न आता विचारला जातोय. सध्या तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याचं समोर आल्यानं वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
“कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून, संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तेव्हापासून २० ते ४५ वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी १८ वर्षांवरील तरुणांना लस देणं गरजेचं आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली, तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणं सोपं होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेगानं लसीकरण केलं गेलं पाहिजे,” अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.
“राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, शहरी भागासह ग्रामीण भागातही करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. करोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे करोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट करोनाची लस द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नाना पटोले यांनी महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यावर केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. “महाराष्ट्राला करोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करत जनतेनंही करोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं. मास्क वापरणं, साबणानं हात स्वच्छ धुणं व सोशल डिस्टंसिंगचं पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा,” असं आवाहनही पटोले यांनी केलं.