Sunday, September 25, 2022
Homeसंसदेच्या गॅलरीतूनचारही राष्ट्रपती नियुक्त खासदार दक्षिणात्य ; भाजपला कोणता गड जिंकायचाय ?

चारही राष्ट्रपती नियुक्त खासदार दक्षिणात्य ; भाजपला कोणता गड जिंकायचाय ?

भाजपने उत्तर भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात सरकार स्थापन केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडील अनेक राज्यात आजही भाजपचा दबदबा कायम असल्याचं दिसून येतं. 2014 नंतर भाजपने एकामागून एक राज्य जिंकली. मात्र दक्षिण भारतात भाजपला पुरेसं यश मिळालं नाही.

कर्नाटक राज्य वगळता दक्षिण भारतातील अन्य कोणत्याही राज्यात भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. तामिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये सातत्याने प्रयत्न करूनही भाजपचे संघटनही मजबूत झालेले नाही.

त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून दक्षिण भारतातून येणाऱ्या बड्या चेहऱ्यांना वेगवेगळ्या संस्था किंवा पदावर संधी देऊन भाजप दक्षिण भारताबाबत किती गंभीर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असल्याचं पहायला मिळतंय.

राष्ट्रपती नियुक्त खासदार-

राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या चार राज्यसभा खासदारांच्या नावांमध्ये सुप्रसिद्ध ऍथलीट पीटी उषा, संगीतकार इलैया राजा, समाजसेवी वीरेंद्र हेगडे आणि प्रसिद्ध पटकथा लेखक-दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती नियुक्त खासदार असले तरी कार्यकारी मंडळ नाव निर्देश करतात. भाजपने यावेळी दक्षिण भारतावर डाव साधला आहे. चारही नावांवरून भाजप दक्षिण भारतासाठी विशेष प्रयत्न करत असून तिथं आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रपती नियुक्त खासदार दक्षिणेतील चार वेगवेगळ्या राज्यातील आहेत. पी टी उषा केरळची आहे. ऍथलीट असलेल्या उषाला राज्यसभेत संधी दिल्याने भाजपला खरंच फायदा होणार का? असा मोठा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय.

इलैयाराजा हे तामिळनाडूचे असून ते दलित समाजाचे आहेत. याशिवाय वीरेंद्र हेगडे हे कर्नाटकातील प्रसिद्ध धर्मस्थळ मंदिराचे प्रमुख आहेत.

चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. एस एस राजामौलीचे वडील आणि बाहुबली, बजरंगी भाईजानचे ते कथालेखक आहेत. विजयेंद्र प्रसाद यांचा आंध्र प्रदेशात बराच वट आहे. त्याचा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता आहे.

भाजपसाठी दक्षिण भारत महत्वाचा का आहे?

2014 साली मोदी लाटेमुळे भाजपने दणदणीत विजय मिळवला पण नंतर मोदींची प्रतिमा खालावली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी केवळ 29 जागा दक्षिण भारतातील होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नाही.

तामिळनाडूमध्ये भाजपने एआयएडीएमके आघाडीसोबत निवडणूक लढवली. पण भाजपला यश मिळालं नाही. केरळमध्येही भाजपने भरपूर ताकद दिली होती पण डावे आणि काँग्रेससमोर भाजपचं काही चाललं नाही. केरळची जनता 5 वर्ष डावे आणि 5 वर्ष काँग्रेसवर विश्वास ठेवते. मागील अनेक वर्षपासून हाच पॅटर्न पहायला मिळतो.

तामिळनाडू, पुडुचेरी, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 130 जागा आहेत. लोकसभेच्या एकूण जागांवर नजर टाकली तर हा आकडा जवळपास एक चतुर्थांश इतका आहे.

या 130 पैकी भाजपला केवळ 29 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 25 जागा कर्नाटकातील आणि उर्वरित चार जागा तेलंगणातील आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप नेत्यांचे तेलंगणा दौरे वाढल्याचं दिसू शकतं.

मोदींच्या मंत्रिमंडळात साऊथ इंडियन तडका-

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही दक्षिण भारतातील आहेत आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे देखील दक्षिण भारताचे रहिवासी आहेत. मोदी सरकारच्या बड्या मंत्र्यांमध्ये निर्मला सीतारामन, जी. किशन रेड्डी आणि व्ही मुरलीधरन हे दक्षिण भारतातून आलेले आहेत.

याशिवाय अनेक राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले मंत्रीही दक्षिण भारतीय असल्याचं दिसून येत. सत्ता नसल्याने प्रत्यक्ष लाभ देता येत नसला तरी अप्रत्यक्षरित्या अनेक पदांवर भाजपने दाक्षिणात्य नेत्यांना वर आणण्याचं काम केलंय. सध्या गोवा, हरियाणा, मणिपूर, मिझोराम, तामिळनाडू आणि तेलंगणाचे राज्यपाल दाक्षिणात्य आहेत.

भाजपचा ‘हैदराबाद प्लॅन’-

यावर्षी भाजपने तेलंगणाच्या हैदराबादमध्ये आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदी मान्यवर नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी रोड शो केला आणि भव्य सभा देखील घेतली. लोकांचा प्रतिसाद जास्त मिळाल्याचं पहायला मिळालं.

भाजप तेलंगणात हातपाय पसरण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री केसीआर यांच्या विरुध्द भाजप प्रमुख विरोधक म्हणून उभा राहू शकतो. पश्चिम बंगाल पॅटर्न राबवण्याच्या तयारीत भाजप दिसत आहे.

असं एकंदरीत चित्र असलं तरी भाजपसाठी दक्षिणेची लढाई सोपी असणार नाही. आगामी काळात भाजप हिंदीचा मुद्दा पुढे करणार का ?असा देखील सवाल उपस्थित केला जातोय.

अधिक वाचा :

भाजपच्या मदतीने दोन शिंदेंचं बंड : मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र थंड…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments