कोरोना रुग्णांना अक्षय कुमारने केली मोठी मदत!

मुंबई : देशात सध्या कोविड-19 साथीच्या दुसर्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. गेले काही दिवस सलग दररोज तीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत असून, बेड,ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे यासारख्या आवश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे. इतक्या प्रचंड रुग्णसंख्येला ऑक्सिजन पुरवणे हे मोठं आव्हान निर्माण झालं असून,ऑक्सिजनअभावी रोज अनेक रुग्ण मरण पावत आहेत. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सरकारसह उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही आपल्या परीनं मदत देत आहेत.
जगभरातील विविध देशांनीही भारताला मदतीचा हात दिला आहे. ऑक्सिजन मशीन्स,औषधे यांचा पुरवठा केला जात आहे. या मदतकार्यात बॉलिवूड कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. संकटकाळात मदतीचा हात देण्यात नेहमीच आघाडीवर असणारा अभिनेता अक्षयकुमार यानंही यामध्ये आपलं योगदान दिलं आहे. नुकतंच त्यानं आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दान दिले आहेत. त्याचबरोबर अक्षय कुमारनं नुकतंच पूर्व दिल्ली मतदार संघाचा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या गौतम गंभीर फाउंडेशनला एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
ट्विंकल खन्ना हिनं काल स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. ‘ दैविक फाउंडेशनच्या माध्यमातून लंडन एलिट हेल्थच्या डॉ.दर्शनिका पटेल आणि डॉ. गोविंद बंकाणी यांनी १२ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारताला दिले असून, अक्षय कुमार आणि मी त्यात आणखी १०० मशीन्सची भर घालण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही एकूण २२० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यात यशस्वी झालो आहोत. याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद.सगळे मिळून आपल्या परीनं मदत करू या.’ अशी पोस्ट लिहित तिनं आपल्या मदतीबाबत माहिती दिली आहे.
तिच्या इन्स्टाग्रामअकाउंटवरील कॅप्शनमध्ये तिनं सकारात्मक संदेशही दिला आहे.‘गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या कुटूंबातील सदस्य आजारी असल्यानं मीही अस्वस्थ होते.परंतु मी त्या स्थितीत जास्त काळ राहू शकले नाही.मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, आपण आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीनं मदत करत राहू या. या वाईट काळावर आपण मात करू आणि त्यातूनही चांगलं घडवूया. आशेचा हा किरण आपल्याला प्रेरणा देईल,’असं तिनं लिहिलं आहे.