Tuesday, October 4, 2022
Homeब-बातम्यांचापत्रकारांचं अपहरण करून निर्घृण हत्या,अहमदनगर हादरलं!

पत्रकारांचं अपहरण करून निर्घृण हत्या,अहमदनगर हादरलं!

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रोहिदास दातीर यांची हत्या झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
रोहिदास दातीर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. राहुरी शहरातील रूग्णालयांचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, स्टेशन रोड परिसरातील १८ एकरचा प्लॉट, नगर मनमाड रोडवरील एक हॉटेल इमारतीबाबत त्यांनी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून रोखठोक लिखाण करून प्रशासनाला जागे केले होते.
काही प्रकरणांचा खटला औरंगाबाद येथील न्यायालयात प्रलंबित आहे. यातील एखाद्या प्रकरणातूनच त्यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळाली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर आपल्या दुचाकीवर घराकडे जात असताना स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचे काल मंगळवारी दुपारी अपहरण केल्याची घटना घडली होती.
राहुरी पोलीस ठाण्यात रोहिदास दातीर यांच्या पत्नीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी आणि गाडीचा शोध सुरू केला. त्यानंतर मंगळवारी रात्री रोहिदास दातीर यांचा कॉलेजरोड इथं मृतदेह आढळला. डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments