मद्रास हायकोर्टाने कान उघडणी केल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

चेन्नई : देशात कोरोना महामारीची परिस्थिती चिंताजनक असताना पाच राज्यात निवडणूका घेण्यात आल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती अशी बिकट असताना निवडणूका हा विषय मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असताना देशातील पाच राज्यात निवडणूका घेण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये खुलेआम प्रचारसभा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणण्यात आले आहे. दरम्यान या निवडणूकांवर मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोग जबाबदार असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशीही टिप्पणी हायकोर्टाने केली आहे. दरम्यान हायकोर्टाने फटकारल्यानंतर आयोगाला जाग आल्याचे दिसून येत आहे. या निवडणूकांचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विजयी मिरवणुकांवर बंदी घातली आहे.
कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे. असे असताना विजयी मिरवणूक काढण्यास आता निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. मतमोजणीच्या दिवशी निवडणूक आयोगास कोरोनाच्या नियमांचं पालन कशा पद्धतीने केलं जाईल यासंबंधी ब्ल्यू प्रिंट सादर करण्यास सांगण्यात आले आहे. येत्या २९ तारखेला पश्चिम बंगालमध्ये अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. कोरोना महामारीमुळे काही राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यापूर्वीच आपल्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. मात्र, तब्बल महिनाभर विशेषत: बंगालमध्ये प्रचारसभांसाठी मोठी गर्दी होताना दिसली होती. त्यामुळे देशभरात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला होता. यासाठी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती.