कॉंग्रेस नंतर राष्ट्रवादीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : १ मे पासून देशभर १८ ते ४४ वयोगटातील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे राज्यातील तिजोरीवर भार पडला आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण राज्य सरकारला करायचे आहे. हे लक्षात घेऊन कालच महाराष्ट्र कॉंग्रेसच्या सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा विचार केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुद्धा सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
याबाबत बोलतांना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात व्यापक लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचा खर्च तसेच राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहीजे यादृष्टीने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
विधानसभा आणि विधान परिषद सदस्य आणि तसेच राज्यातील सर्व खासदारांचे एक महिन्याचे वेतन मिळून आणखी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा असे आवाहन जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.