सचिन वाझे नंतर मुंबई पोलीस दलातील आणखी एका अधिकाऱ्याला अटक

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन आढळून आल्या प्रकरणी सचिन वाझे नंतर मुंबई पोलीस दलातील एपीआय रियाज काझी यांना अटक करण्यात आली आहे. एनआएने ही अटक केली आहे. एनआयए यापूर्वी अनेकवेळा रियाज काझी यांची चौकशी केली होती. काझी हे निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे निकटवर्तीय होते.
अंबानींच्या घरासमोर स्फोटक प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप काझी यांच्यावर आहे. गुप्तवार्ता विभागात सचिन वाझे यांच्यानंतर रियाज काझी दुसरे मोठे अधिकारी होते. याप्रकरणाचा तपास काझी यांच्या देखरेखी खाली सुरू होता. रियाझ काझी यांनी काही ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज आपल्या कडे घेतले होते. पुरावे नष्ट करण्याबरोबरच तथ्य लपविणे या दोन मुद्द्यावर काझी यांना अटक केली आहे.
या प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची रवानगी न्यायालयीन कोठीत करण्यात आली आहे. वाझे यांच्यावर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके भरलेले वाहन ठेवणे आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येचा आरोप आहे.