नाशिकनंतर बीडमध्येही ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप.

बीड : नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमधील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कोविड रुग्णालयात अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नातेकवाईकांनी याबद्दल आरोप केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दावा फेटाळून लावला आहे.
ऑक्सिजन अभावी बीड जिल्ह्यातील परिस्थितीत गंभीर होऊ लागली आहे. ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याने बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. परळी पाठोपाठ आता अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात देखील ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. २ आणि ३ वार्डात ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, हा आरोप अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी फेटाळला आहे.
बीड, अंबाजोगाई, परळी आणि आष्टी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आज सकाळपासूनच परळीतील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानं परिस्थितीत चिंताजनक बनली आहे.
अंबाजोगाई मधील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात देखील ऑक्सिजनचा पुरवठा घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनची बेड संख्या २२५ असून दररोज ८०० सिलेंडरची मागणी आहे. मात्र, ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने लातूर, बीड या ठिकाणाहून ऑक्सिजन मागवण्यात आले आहेत. परंतु पुरवठा कमी असल्यानं प्रशासन देखील आता हतबल झाले आहे.