पक्षीय निर्णयावरून कॉंग्रेस नेत्यांमध्येच जुंपली
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या विधान सभा निवडणुकीसाठी नव्याने संघटीत केलेल्या इंडियन सेक्युलर फ्रंट मध्ये कॉंग्रेसचे सामील होणे हे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा यांना खटकले होते. इंडियन सेक्युलर फ्रंट पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला अनुसरून नसल्याने त्यांनी कॉंग्रेसच्या निर्णयावर आक्षेप घेतला. पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मात्र आनंद शर्मा यांचा खरपूस समाचार घेत वैयक्तिक राजकारण बाजूला ठेवून भाजपचा अजेंडा रेटणे बंद करण्याचा सल्ला दिला.
अधीर रंजन चौधरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद शर्मा यांनाच चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. “मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा या धर्मनिरपेक्ष युतीचे नेतृत्व करत आहे. कॉंग्रेस या युतीचा एक अविभाज्य भाग आहे. भाजपच्या जातीयवादी, हुकुमशाही आणि फुटीर राजकारणाला पराभूत करण्याचा आमचा निश्चय आहे”, असे चौधरी म्हणाले.
“कॉंग्रेसला आपल्या वाटेच्या जागा मिळाल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्या वाटेच्या जागा नव्याने संघटीत केलेल्या इंडियन सेक्युलर फ्रंट साठी दिल्या आहेत. तुमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या निर्णयाला जातीयवादी म्हणणे भाजपच्या धृविकरणाच्या अजेंड्याला पाठींबा देण्यासारखे आहे. असे करण्यापेक्षा पाचही राज्यांमध्ये भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध लढा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्यांनी कॉंग्रेसला पाठींबा द्यावा” असेही त्यांनी नमूद केले.
नुकतेच जम्मू मधील एका मेळाव्यात गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. याचाही सामाचार अधीर रंजन चौधरी यांनी घेतला. “काही निवडक आणि प्रतिष्ठित कॉंग्रेस नेत्यांना माझे म्हणणे आहे की वैयक्तिक समाधानच्या मुद्द्यांना बाजूला ठेवून पंतप्रधानांचे गोडवे गाण्यात वेळ व्यर्थ घालवू नये. ज्या वृक्षाने तुमचे संगोपन केले त्याला कमी लेखणे बंद करून पक्षाच्या सशक्तीकरणाचे कर्तव्य पार पडावे”, असे चौधरी म्हणाले.