Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयआनंद दिघेंनंतर सर्वात जास्त काळ जिल्हा प्रमुख पदी राहण्याचा रेकॉर्ड अंबादास दानवे...

आनंद दिघेंनंतर सर्वात जास्त काळ जिल्हा प्रमुख पदी राहण्याचा रेकॉर्ड अंबादास दानवे यांनी केलाय..

महाराष्ट्र विधान परिषदेत अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली असल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. थेट पक्षावरच शिंदे गटाने दावा केल्याने उद्धव ठाकरे गटावर मोठे संकट ओढवलेले आहे. त्यातच विधान परिषदेत शिवेसेनेला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.

तसेच विधानपरिषद सदस्य, उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे आमदार रमेश बोरणारे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, संभाजीनगरचे (पश्चिम) संजय शिरसाट, औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, पैठणचे संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केले.

वैजापूरचे – उदयसिंग राजपूत हे एकमेव आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामुळेच ते आमदार झाल्याने त्यांनी बंडाळी केली नसल्याचे सांगितले जाते. आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी खैरे यांनी राजपूत यांना शिवसेनेत घेत बळ दिले.

बालेकिल्ल्याला भगदाड पडल्याने शिवसेनेने संभाजीनगरमध्ये संघटनात्मक पातळीवर अधिकच लक्ष दिल्याचे दिसते. याचाच भाग म्हणून संभाजीनगरचे शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी वर्णी लावली आहे.

अंबादास दानवे यांची राजकीय पार्श्वभूमी

अर्थशास्त्र, वृत्तपत्रविद्येत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अंबादास दानवे यांनी भाजप युवा मोर्चात झोकून देत काम सुरु केले. पण त्यांचे काम शिवसेनच्या राडा कल्चरप्रमाणे होते. मूळच्या आक्रमक असलेल्या अंबादास दानवे यांनी भाजप युवा मोर्चात शिवसेनेच्या स्टाईलनुसार, काम केले.

त्यामुळेच त्यांच्यावर एका प्रकणात कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर त्यांनी संभाजीनगर भाजप युवा मोर्चातून शिवसेनेत उडी घेतली.

शिवसैनिक ते जिल्हा प्रमुख

१९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अंबादास दानवे यांना २००० मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहभाग घेतला. अजबनगरमधून नगरसेवक होत त्यांनी मनपाच्या सभागृह नेते पदापर्यंत मजल मारली.

पण इथेही त्यांना त्यांचा आक्रमकपणा नडला. एका वादग्रस्त प्रकरणात पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे पक्षाने त्यांच्याकडून राजीनामा घेतला. त्यामुळे पुढे चार वर्ष ते केवळ शिवसैनिक म्हणूनच कार्यरत राहिले.

याबाबत संभाजीनगरमधील एक शिवसैनिक सांगतात,

नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यांनतर पुढील काळात दानवे यांनी खूप संयम बाळगला. पक्षाने कारवाई केली म्हणून त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेणे टाळले. याचे फळ त्यांना मिळाले.

पुढे २००४ मध्ये संभाजीनगर प्रभारी जिल्हाप्रमुख पद मिळाले. हे पद त्यांना निष्ठेचे फळ म्हणून दिले गेल्याचे बोलले जाते.पुढे २००४ ची विधानसभा निवडणूक लागली. तत्कालीन जिल्हा प्रमुखांना विधानसभेची उमेदवारी मिळताच रिक्त झालेल्या जिहा प्रमुख पदी दानवे निवडले गेले.

आमदार ते विरोधी पक्ष नेते

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गंगापूरमधून उमेदवारी अर्ज भरत अंबादास दानवे यांनी जोर लावला. मात्र, भाजप उमेदवाराकडून त्यांना पराभव पचवावा लागला. त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूकही ते लढण्यास इच्छुक होते. पण शिवसनेने चंद्रकांत खैरे यांच्यावरच परत एकदा विश्वास दाखवला.

त्यांनतर ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संघटनेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसनेने दानवे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत साम, दाम, दंड आणि भेद वापरून ते विजयी झाल्याचे बोलले जाते.

दानवेंच्या विजयसाठी थेट मातोश्रीवरून रणनीती आखल्याचे सांगितले जाते. ते आमदार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळात त्यांना संधी मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही.

आता सहापैकी पाच आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असताना अंबादास दानवे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांची भूमिका बजावत बंडखोरांना अंगावर घ्यायला सुरुवात केली आहे.

संभाजीनगरसह मराठवाड्यातील आमदारांनी बंडाचा पवित्रा घेतला असल्याने शिवेसेनेला आपल्या बालेकिल्ल्यात पुन्हा गतवैभव प्राप्त करायचे असेल, तर आक्रमक चेहऱ्याला बळ देणे आवश्यक होते. त्यामुळेच विरोधीपक्ष नेते पदी मराठवाड्यातील आमदाराला संधी दिली आहे.

संभाजीनगरमधील सहापैकी पाच आमदारांनी बंडाळीचे पाउल उचलले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील मंत्री मंडळ विस्तारत तीन आमदारांना मंत्री पददिले गेले आहे. यामुळेच संभाजीनगरमधूनच विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्याची खेळी शिवसनेने खेळली आहे.

खैरे यांना पर्यायी नेतृत्व

२०१९ मध्ये दानवे यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यांनतही जिल्हा प्रमुख पद त्यांच्याकडेच ठेवले. २००४ पासून जिल्हा प्रमुख पद दानवे यांच्याकडे आहे. आजवर खांदेपालट झालीच नाही. ते आमदार झाल्यानंतर नवीन जिल्हा प्रमुख मिळेल, असे वाटत होते.

मात्र, खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने नवीन नेतृत्वाला बळ देण्यासाठी आमदार आणि जिल्हा प्रमुख ही दोन्ही पदे दानवे यांच्याकडे ठेवली गेली असल्याचे बोलले जाते.

खैरे आणि दानवे यांच्यातील संघर्ष संभाजीनगरकरांना नवीन नाही. त्यातच २०१९ मध्ये खैरे एवजी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केल्याने दानवे विरुद्ध खैरे यांच्यात सुप्त संघर्ष अधिकच वाढला होता.

आनंद दिघे यांच्यानंतर सर्वात जास्त काळ जिल्हा प्रमुख असणारे दानवे एकवेम

आनंद दिघे यांचा २००१ मध्ये मृत्यू झाला. मरेपर्यंत ते जिल्हा प्रमुख होते. दोन दशके त्यांनीच ठाणे जिल्हा प्रमुख पद सांभाळले. या पदापेक्षा कैकपटीने त्यांचे नेतृत्व मोठे होते. मात्र, १८८० च्या दशकापासून या पदावर तेच कायम होते.

असाच रेकॉर्ड अंबादास दानवे यांच्या नावे आहे. जवळपास दोन दशके होत आली, संभाजीनगर जिल्हा प्रमुख पदी तेच कायम आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या संभाजीनगरचे ते जिल्हा प्रमुख असणे, ही बाब मोठी मानवी लागेल.

पक्षातील नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून दानवे आणि खैरेंमध्ये खटके उडत असायचे. एकच व्यक्ती दोन दशके या पदावर आहे, यामुळे अंतर्गत गटबाजी उफाळून येणे, स्वभाविकच आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीतुन दानवे यांच्याएवजी दुसऱ्या व्यक्तीला संधी मिळावी, याकरिता प्रयत्न झाले.

मात्र, मातोश्रीने दानवेनांच पसंती दिली. मातोश्रीने दाखविलेल्या विश्वासामुळेच ते दोन दशके जिल्हा प्रमुख राहू शकले.

अधिक वाचा :

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments