मनसेच्या ‘या’ माजी आमदाराचे कौतुकास्पद पाऊल; घेतला हा निर्णय

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. ऑक्सिजन, रेमडेसीवीरची कमतरता जाणवत आहे. तर १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. हे लक्षात घेवुन मनसे नेते व माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी एक महत्वाचे पाऊल उचले असून राज्यातील इतर लोकप्रतिनिधींनी आत्मसात करण्याची गरज आहे.
माजी गृहराज्य मंत्री बाळा नांदगावकर यांनी माजी आमदार म्हणून मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सध्या राज्याचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे मला मिळणारे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे म्हटले आहे.
सध्या राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा ऑक्सिजन, रेमडेसीवीरची कमी जाणवत आहे. तसे १ पासून १८ वर्षावरील सर्वाचे लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्र शासनावरील खर्चाचा बोजा वाढला असून सध्याच्या लॉकडाऊन सदृश्य परिस्थितीमुळे शासनाच्या उत्पन्नात घट झाली आहे.
या पार्श्वभूमीवर एक जबाबदार लोकप्रतिनिधी माजी आमदार व माजी गृहराज्यमंत्री तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून मला मिळणारे एप्रिल २०२१ चे मानधन कोविड खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावा व तसे आदेश संबधितांना द्यावेत असे सांगितले आहे.
त्याच बरोबर राज्यातील माजी- आजी आमदार – खासदार या महाराष्ट्रातील सर्वच लोकाप्रतीनिधिनी आपले मानधन जे आपणास मिळते ते सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावे. असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे. तसेच राजकीय पक्षांनी देखील अशा कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहकार्य करणे काळजी गरज असल्याचे सांगितले आहे.