आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

काँग्रेसचा घरचा आहेर

मुंबई: राज्यातील सत्तेत शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकदिलानं काम करत असले तरी मुंबई महापालिकेत या दोन्ही पक्षांमधून विस्तव जाताना दिसत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींची तफावत असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालिकेतील काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

सध्या राज्यात १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, मुंबई महापालिकेतील कर निर्धारण व संकलन विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. एकट्या जी/ दक्षिण विभागातील वरळी भागातील मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींचा तर संपूर्ण मुंबईत ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच याबाबत आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

वरळी, परळ यांसारख्या भागात अनेक ठिकाणी मिलच्या मोक्याच्या व कमर्शियल जागा आहेत. यामध्ये कमला मिल, रघुवंशी मिल, मॉल्स, पब, इंडस्ट्री आदी कोट्यवधी रुपये किमतीच्या जागा आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पालिकेला मालमत्ता करापोटी काही कोटी रुपये येणे अपेक्षित असते. मात्र कर निर्धारण व संकलन विभागातील अधिकारी मालमत्ता कर आकारणी करताना व त्यांची देयके संबंधित जागा मालकांना पाठवताना त्यांच्या जागेचे आकारमान व त्यांचे मूल्य कमी दाखवतात. त्यामुळे त्या मालमत्तेचा मालमत्ता कर हा काही कोटींऐवजी काही लाखात आकारला जातो. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांच्या महसुली उत्पन्नाला मुकावे लागते. मात्र संबंधित खात्याचे अधिकारी हे संबंधित मालकांकडून चिरीमिरी घेऊन गब्बर होतात आणि त्यामध्ये त्या कोट्यधीश लोकांनाही चांगलाच आर्थिक लाभ होतो, असं टीव्ही9 मराठीशी बोलताना रवी राजा यांनी शिवसेनेला हा घरचा आहेर दिला आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *