रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार?
मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. एकाचे नाव सांगून दुसऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, फोन टॅपिंगचे प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेतले आहे. तसेच त्यांनी यावेळी गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या चौकशीचे संकेतही दिले.
पोलीस दलातील बदल्याच्या रॅकेट बाबतचा आरोप त्यांनी फेटाळला. ‘या संदर्भात फडणवीस यांनी जी कागदपत्रे दिली ती आमच्याकडे सुद्धा आहे. त्यापैकी कुठल्याही अधिकाऱ्याच्या बदल्या कागदपत्रामध्ये दाखविल्या ठिकाणी झालेले नाही. पोलिसांच्या बदल्या त्यासाठी असलेल्या समितीच्या शिफारसी नुसारच झाल्याचे पवार यांनी सांगितले.
फोन टॅपिंग बाबत अजित पवार यांनी सरकारची बाजू मांडली. ‘कोणत्याही अधिकाऱ्याला फोन टॅपिंग करायचा असल्यास गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवाची परवानगी घ्यावी लागते. यामुळे यावेळी अशी परवानगी घेण्यात आली होती का? पोलिसांच्या बदल्या कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आल्या? नेमक काय झाले? या सर्व गोष्टींचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असणारे आणि आता मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून अहवाल मागविला आहे. आज संध्याकाळ पर्यंत हा अहवाल येईल. त्यातून सत्य जनतेसमोर येईल. फोन टॅपिंग हे बेकादेशीर असल्यास संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.