नाशिकमधल्या स्टॅम्प घोट्याळ्यामुळे अब्दुल करीम तेलगी पुन्हा आला चर्चेत…
नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प घोटाळ्यानं डोकं वर काढलं आहे. बहुचर्चित तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर या नव्या घटनेनं पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आलं आहे. सध्या तरी देवळा तालुक्यातील कोट्याधीश झालेला एक स्टॅम्प वेंडर जाळ्यात सापडला असला तरी या मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची माहिती समोर येत आहे. मुद्रांक महासंचालकांनी याची दखल घेत तत्काळ कागदपत्रे घेऊन मुद्रांक कर्मचाऱ्यांना पुण्यात बोलावलं. रस्त्यात नारायणगावात नाश्त्यासाठी थांबलेल्या या कर्मचाऱ्यांच्या गाडीची काच फोडून चक्क कागदपत्रांची चोरी झाली आणि यातील संशय अधिक बळकट झाला. तातडीनं मुद्रांक महासंचालकांचं विशेष पथक नाशकात दाखल झालं आणि दुय्यम निबंधकांना निलंबित केलं. याच प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात, अशी माहिती आहे. मात्र, जोपर्यंत खरे सूत्रधार म्हणून नाव येत असलेला संशयीत वेंडर वाघ बंधू पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या घोटाळ्याची खरी व्याप्ती स्पष्ट होणार नाही.
अलीकडेच समोर आलेल्या ह्या स्टॅम्प घोटाळ्यामुळे, २००३ मध्ये उघडकीस आलेला अब्दुल करीम तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता हा तेलगी कोण होता आणि त्याने केलेला हजारो कोटींचा गैरव्यवहार उघडकीस कसा आला ते आपण बघूया…
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात जन्मलेला अब्दुल करीम तेलगी हा रेल्वेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा मुलगा होता. तेलगी मुंबईमध्ये ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करत होता. मुंबईत असताना त्याने अंडरवर्ल्डशी सुत जुळवले आणि हळूहळू तो गुन्हेगारी मध्ये पारंगत होत गेला. त्याला सर्वप्रथम १९९१ मध्ये मुंबई पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. तुरुंगात त्याची ओळख रतन सोनी या माणसासोबत झाली. रतन सोनी देखील अशाच अवैध कामांसाठी कुप्रसिद्ध होता. त्याने तेलगीला सांगितले किस्तान पेपर ऑफिस हे सरकारच्या लेखी दुर्लक्षित डिपार्टमेंट आहे त्यामुळे ते निश्चितच फायद्याचे आहे.
१९९४ मध्ये त्याने आपल्याकडचे पोलिटिकल कनेक्शनची मदत घेऊन मुद्रांक विक्रेता म्हणून लायसन्स मिळवले आणि नाशिक सिक्युरिटी प्रेस ने मोडीत काढलेले एक मशिनही विकत घेतले. एकापाठोपाठ एक मशीन विकत घेत त्याने बनावट मुद्रांक निर्मिती सुरू केली. हा बनावट व्यवहार करताना त्यांनी मुद्रांक छपाईसाठी लागणाऱ्या विशिष्ट प्रकारचा कागद सिक्युरिटी प्रेसमधून मिळवला आणि सिक्युरिटी प्रेस ज्या पद्धतीने मुद्रांक छापायचे तसाच मुद्रांक तेलगीही छापायचा. बनावट स्टॅम्प पेपर, न्यायालयीन शुल्क स्टॅम्प, महसूल स्टॅम्प, विशिष्ट कारणांसाठी वापरले जाणारे वेगवेगळे स्टॅम्प, इन्शुरन्स पॉलिसी ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स एजन्सी पर्यंत तेलगीच्या गैरव्यवहाराचा धंदा वाढतच गेला. भारतात मुद्रांक तुटवडा असतो त्याचा गैरफायदा घेत त्याने आपला धंदा सर्वदूर पसरवला. बँका इन्शुरन्स कंपन्या शेअर बाजारातील दलाल आदींना तेलगी हा घाऊक पद्धतीने बनावट कागदपत्रे पुरवायचा. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, त्याने हा व्यवहार सांभाळण्यासाठी एम. बी. ए केलेल्या तब्बल ३०० तरुणांना कर्मचारी म्हणून नेमले होते.
तेलगीचे रॅकेट उघडकीस आले ते दिल्लीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त विजय मालिक यांच्यामुळे, जानेवारी २००३ मध्ये पुण्यात बनावट मुद्रांक विकले जात असल्याची टीप त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि समोर आलेल्या घोटाळ्याने अवघा देश हादरला होता. पोलिसांनी फोन टॅप करून तेलगीला २००३ मध्ये अजमेर मध्ये अटक केली. तपासादरम्यान तेलगीने सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक दहा वर्षांच्या कालावधीत विकले असल्याचा अंदाज समोर आला. म्हणजे तेलगीचे एजंट रोजच तब्बल पन्नास हजार रुपयांच्या बनावट मुद्राकांची विक्री करायचे.
मुंबईच्या ग्रँड रोड वरच्या एका डान्स बार मधल्या डान्सर वर तेलगीने एका रात्रीत ९३ लाख रुपये उधळले होते असं बोललं जातं. यावरून आपण अंदाज लावू शकतो की, या समस्यांमधून त्याने कितीतरी कोटी कमावले असणार. तेलगीला अटक झाल्यानंतर हा गैरव्यवहार दोन हजार कोटी रुपयांचा असल्याचे सर्वप्रथम सांगण्यात येत होते. परंतु हळूहळू तपासादरम्यान माहिती बाहेर येऊ लागली की, हा गैरव्यवहार तब्बल ३२ हजार कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात तेलगी विरुद्ध बनावट मुद्रांक प्रकरणातून २००३ मध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्याच दरम्यान भिवंडीतून २,२०० कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त करण्यात आले होते. त्यानंतर सरकारने तेलगीच्या या चौकशीसाठी स्पेशल इन्वस्टिगेशन टीमची (SIT ) स्थापन केली. एसआयटीच्या अहवालात नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमधील अधिकाऱ्यांना जबाबदार मानण्यात आलं. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही.
२००५ च्या दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीत सहभागी असलेले पोलिस अधिकारी प्रताप प्रभाकर काकडे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्यावर बनावट मुद्रांक छपाईची मशीन चौकशीच्या वेळी जप्त केलीच नसल्याचा असल्याचा आरोप होता. काकडे यांच्या मृत्यूप्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि कारागृहातील कर्मचाऱ्यांना अटकही झाली होती परंतु पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष सोडण्यात आले होते. या खटल्यादरम्यान त्याला २९ जून २००७ मध्ये २०२ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता तसेच तीस वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा त्याला झाली होती. त्यानंतर जुलै २०१७ मध्ये तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता कारण निवृत्त पोलिस उपमहानिरीक्षक डी.रूपा यांनी आरोप केला होता की तेलगीला कारागृह प्रशासन विशेष सवलती देतात. त्याला कारागृहातील तीन ते चार कर्मचारी मसाज आणि मालिश करून देतात असा आरोपही रुपा यांनी केला होता. इंडियन एक्सप्रेस २०१७च्या एका रिपोर्टनुसार, तो गेल्या २० वर्षांपासून डायबिटीस आणि उच्च रक्तदाबामुळे पीडित होता. त्याला एड्सची लागण देखील झाली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये बँगलोर मधील एका दवाखान्यात अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर १ डिसेंबर २०१८ मध्ये पुराव्याअभावी स्टॅम्प घोटाळ्यामधील सगळ्या आरोपींची न्यायालयाने सुटका केली.