जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लशीचा एकच डोस घ्यावा लागणार

परवानगीसाठी कंपनीचा भारताकडे अर्ज
नवी दिल्ली : जगभरात सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यातून सुटण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. यासाठी सर्व देश एकत्र येऊन लस उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. औषधनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson & Johnson) कंपनीनेही आपल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी भारताकडे परवानगी मागितली आहे.
जॉन्सन अँड जॉन्सनने १२ एप्रिल रोजी सुगम ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ग्लोबल क्लिनिकल ट्रायल विभागात अर्ज केला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे कंपनीने पुन्हा काल अर्ज दाखल केलाय.
जॉन्सन अँड जॉन्सनची लस ३ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानावर ३ महिन्यांसाठी ठेवता येते. या लशीचा एकच डोस घ्यावा लागतो. सध्या देशात परवानगी देण्यात आलेल्या तिन्ही लशींचे दोन डोस घ्यावे लागतात. या लशीची किंमत ८.५ डॉलर ते १० डॉलर म्हणजे साधारण ६३७ ते ७५० रुपये असू शकते.
सध्या तातडीच्या वापरासाठी लशीच्या चाचण्यांच्या अनिवार्यतेच्या अटी शिथील करण्यात आल्या असून, जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देशांमधील औषध नियामक यंत्रणा ठराविक चाचण्या पूर्ण केलेल्या लशींना मान्यता देत आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीलादेखील जागतिक आरोग्य संघटनेसह युरोप, अमेरिका आणि जपानमधील नियामकांची परवानगी मिळाली असून आता कंपनीने भारताकडे अर्ज केला आहे.
अमेरिका, युरोप किंवा जपानमधील नियामकांकडून तसंच जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणत्याही प्रकारची मान्यता प्राप्त झालेल्या लशींना तातडीच्या वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने भारतीय औषध नियामक संस्थेकडे अर्ज केला आहे. लसीचा आयात कर याताही परवान्याची मागणी केली आहे. आपल्या अर्जावरील निर्णयासाठी लवकरात लवकर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) कोविड-19 च्या तज्ज्ञ समितीची बैठक बोलवण्याची विनंतीही कंपनीने केली आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीचा परिणाम जगभरात ६६ टक्के तर अमेरिकेत ७२ टक्के दिसून आला आहे.