एक क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात देह ठेवतो आणि इकडे हा तरुण सैरभैर होतो…

मातीचा एक कण निर्माण करायचा असेल, तर शंभर वर्ष लागतात. एक यशवंतराव निर्माण करायला तर दोन-दोन शतकं जातील. हिंदुस्तानच्या इतिहासात १९३० ला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. काँग्रेसचे अधिवेशन १९३० मध्ये लाहोरमध्ये झालं जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली. त्यात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी काँग्रेसच्या अधिवेशनात झाली आणि यशवंतरावांचा राजकारणात प्रवेश १९३० मध्येच झाला. बऱ्याच घटना त्या वेळेला घडत होत्या. यशवंतरावांचे बंधू गणपतराव हे सत्यशोधक चळवळ तसेच ब्राह्मणेतर चळवळीचे कार्यकर्ते होते.
यशवंतरावांनी खुद्द लिहून ठेवलेलं आहे की, “मी त्यावेळी अडखळत होतो. टिळकांवर टीका करण्याची मोठी जबरदस्त लाट त्या काळात आली होती. ते मला पटायचं नाही पण एक लक्षात येत होतं की मानवेंद्रनाथ रॉय म्हणतात की, आपल्या स्वातंत्र्यलढ्याची सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा विषय जोडला पाहिजे”. हे त्यांच्या लक्षात यायचं म्हणून ते रॉयवाद्यांकडे वळले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील आणि विठ्ठल रामजी शिंदे यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. साताराच्या पत्री सरकारच्या कामांमध्ये ते सहभागी झाले. ना. सी फडके, खांडेकर यांच्यापासून ते आपल्या विदर्भातले यशवंत मनोहरांपर्यंत सगळं यशवंतरावांनी वाचलेलं असायचं. जगामध्ये साहित्यातील नोबेल कोणाला मिळालेलं आहे, काय लिहिलंय इथपासून ते शंकरराव खरात, माडगूळकरांनी काय लिहिलंय आणि मनोहरांनी काय लिहिलंय हे सगळं त्यांना माहिती असायचं तब्बल दहा हजार ग्रंथ त्यांनी गोळा केलेले होते.
जतींद्रनाथ दास यांनी लाहोरच्या कारागृहात ६२ दिवस उपोषण केलं. कुठल्याही साहित्यिकाची प्रतिभावंतांची प्रतिमा उणी पडेल, इतकं सुंदर वर्णन त्यांचे यशवंतरावांनी केलेलं आहे ते असे, ‘जतींद्रनाथ यांचे उपोषण सुरू होतं. तेवीस दिवस पूर्ण झालेले होते. ज्ञानप्रकाश, केसरी, खाडिलकरांचा नवा काळ कसा वाचायला मिळेल याच्यासाठी धडपडत असायचो. कराडला चालत यायचा आणि तेथून पेपर घेऊन जायचो. एके दिवशी कळलं की जतींद्रनाथ दास यांना कारागृहातल्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्यांचा छळ करण्यात आला. ते दिवसेंदिवस खचत चालले, खंगत चालले, पोखरत चालले होते. उपोषणाच्या ६२ व्या दिवशी सबंध सृष्टीला प्रकाश देणारा सूर्य जेंव्हा दुपारी एक वाजता जगाच्या डोक्यावर आला होता, तेव्हा भारताच्या क्रांतीचा एक सूर्य लाहोरच्या कारागृहात मावळला.’ हे यशवंतरावांचं वर्णन आहे.
पुढे यशवंतरावांनी असे लिहिलं की, ‘जतींद्रनाथ दास यांचा मृत्यू झाल्याची बातमी वाचून मी घराकडे निघालो. एकटाच होतो. मला समोर काही दिसत नव्हतं. काही क्षणात मी एकाएकी रडायला लागलो. मी रडायला केव्हा लागलो हे सुद्धा मला कळलं नाही. झाडे दिसली नाहीत, पक्षी दिसले नाहीत फक्त एकांतातला वारा इकडून तिकडे वाहत होता. मी घरी गेलो आईला काही सांगता येईना मला विठाईला काय सांगता येईना. काय झालंय? तिला फक्त एवढंच कळलं की, कलकत्त्याला कोणतरी एक माणूस मरण पावलाय. माझ्या पोराला त्याच्यामुळं कसनुसं व्हायला लागलं.’काय वर्णन केले यशवंतरावांनी!’
एक क्रांतिकारक तिकडे कारागृहामध्ये देह ठेवतो आणि हा तरुण मनुष्य इकडे कसा तरी करतो! हे व्यक्तिमत्व इथेच थांबत नाही. त्यांचं वक्तृत्व, विचार मांडण्याची क्षमता शब्दातच सामर्थ्य हे फार असामान्यांतलं. हे सर्व त्यांना कारागृहातुन मिळालं होतं. राजकीय विचारांची दिशा त्यांना तिथेच कळली होती.
भाऊसाहेब खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तेव्हाचा एक प्रसंग म्हणजे, कोल्हापूरमध्ये सतपाल युवराज ही कुस्ती झाली, जिथे हमीद महंमद ची कुस्ती झाली तिथे ज्ञानपीठ मिळाल्यानंतर भाऊ साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या होत्या दुर्गाबाई भागवत. यशवंतराव चव्हाण अध्यक्ष होते. कराडच्या संमेलनात दुर्गाबाई भागवत अध्यक्ष होत्या तेव्हा सबंध समूहातून अशी मागणी आली की जयप्रकाश यांची प्रकृती बरी नाही तर त्यांना आराम पडावा अशी सर्वांनी प्रार्थना करावी. यशवंतराव त्यावेळी केंद्रात मंत्री होते. इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली होती आणि यशवंतरावांवर मोठं दडपण आलं होतं. जयप्रकाशांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी सर्वांनी प्रार्थना केली. तिथे यशवंतराव देखील उपस्थित होते. त्यांनी देखील श्रद्धेने भावना व्यक्त केल्या. असा तो आणीबाणीचा काळ होता. एक शिरोड्याच्या असामान्य शिक्षक, भाऊ साहेबांचा सत्कार झाला. दुर्गाबाईंचे भाषणही झाले. आणि मग यशवंतराव बोलायला उभे राहिले आणि पहिलंच वाक्य तोंडून बाहेर पडलं, “करवीरच्या जनतेने मला असं सांगितलं पाहिजे की, पंचगंगेला आलेला पूर आपण नेहमी पाहतो, पण आज लोकगंगेला आलेला पूर पाहतो आहोत”. यशवंतरावांचे हेच वैशिष्ट्य आहे की, शब्दांनीसुद्धा बराच बदल घडवता येतो हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. भाषा, अभिरुची, संस्कृती, परस्परांचा सन्मान ठेवण्याची क्षमता आहे याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. इथली क्रांतिकारकांची परंपरा काय आहे हे सगळं यशवंतरावांना चांगल्या प्रकारे माहिती होतं. दगडातून हिरकणी घडावी तसं यशवंतरावांचं व्यक्तिमत्व होतं !