सर करता न येणारा ‘Sir’

सर करता न येणारा 'Sir'
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

२०१८ च्या कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होऊनही टिपिकल मसाला नसल्याने ‘सर’ फारसा चर्चेत आला नाही. मात्र सध्याच्या कोंडल्या स्थितीत नेटफ्लिक्स वर सर ची हजेरी लागली आणि शिळ्या कढीला ऊत म्हणालात तरी हरकत नाही पण या ताक-कण्या अनेकांना मानवल्या.
स्त्री- पुरुष नातेसंबंध हा हिंदी चित्रपटांच्या पटकथांचा टीआरपी विषय राहिलेला आहे. आणि अर्थातच त्यामुळे हिरो- हिरोईन यांच्या भोवती काहीही करुन कथा फिरवत ठेवण्याची कसरत लेखक- दिग्दर्शक करत आलेले आहेत. हे असाव की नसावं हा भाग अलाहिदा. पण सर या टिपिकल मांडणीला छेद देत स्त्री पुरुष नातेसंबंधांच्याच अनुषंगाने पण व्यवहार्य कंगोरे घेऊन आपलं म्हणणं मांडू पाहतो.
काही कारणाने लग्न मोडलेला ‘अश्विन’ हाच चित्रपटाचा नायक – ‘सर’ आहे. चित्रपटाची सुरुवात लग्नामुळे घरी काम करणाऱ्या मोलकरणीला (चित्रपटात ‘ servant – मदतनीस असा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला आहे) म्हणजेच ‘रत्ना’ ला ताबडतोब कामावर हजर राहयला सांगवण्यापासून होते. निराश अश्विन आणि त्याला झाल्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारायचा आपला वकूब नाही याचं पूर्ण भान असणारी रत्ना त्याच्या जेवण्या खाण्याच्या वेळा पाळण्या पलीकडे काही करु शकत नसते. त्या दोघांच्या नात्यातले हे अंतर, ही तटस्थता कमालीच्या विलक्षणपणे लिहिली आणि रंगवली गेलेली आहे. अश्विन’ मितभाषी, हळवा लेखक, अपरिहार्य उद्योजक’ अशा वेगवेगळ्या भूमिकांत अत्यंत संयत वावरताना दिसतो. तर दुसरीकडे अकाली वैधव्य आलेली आणि परिस्थितीने गावाकडून मुंबईत येऊन काम करणारी’ प्रामाणिक, नम्र परंतु तितकीच मानी आणि स्वप्नं पाहण्याची कुवत असलेले’ अशी रेखीव.
वर्ग संघर्ष पाहताना आपण सरळ दोन कप्पे पाडून मोकळे होतो अनेकदा. पण मानवी व्यवहार अर्थिकतेपलीकडे असतात. आणि समाजाने घालून दिलेली नैतिकता, धर्म- जात-लग्नसंस्था आदींनी घालून दिलेली लक्ष्मणरेषा मानवी मन एका टप्प्यावर झुगारून देत असतं. अश्विन-रत्ना असेच एकमेकांच्या जवळ विश्वासाच्या, एकटे आणि समदुःखी असण्याच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या प्रती असणाऱ्या आदराच्या भावनेने जवळ येतात. मोहाचे क्षण कुणाला चुकतात ? पण त्यावेळी शहाणीव शाबूत असणारी माणसं परिस्थिती जोखून निर्णय घेतात. रत्नाला हवाहवासा वाटणारा पुरुष, तोही गर्भश्रीमंत पण औरस पद्धतीने न मिळू शकणारा – ती नाकारते.’ भगवान को मानती हो ?’ या प्रश्नाला ‘मानना पडता है…’ असं सूचक उत्तर देणारी रत्ना’ जिंदगी कभी रुकती नहीं’ अशा छोट्या वाक्यातून स्वतःचे निग्रह बळकट करत राहते.
बहिणीच्या शिक्षणासाठी झटणारी, फॅशन डिझायनर व्हायचं स्वप्न बघणारी, मैत्रीण कामवाली लक्ष्मीचं दुःख समजून घेणारी रत्ना आत्मसन्मान गमावून अश्विन कडे न जाण्याचं ठरावे तेंव्हा सुकृत दर्शनी अव्यवहारी वाटणारा निर्णय खरे पाहता किती मूलभूत नैतिकता आणि आत्मभान शाबूत ठेवणारा असू शकतो याचा विचार सतत प्रेक्षकांना अंतर्मुख व्ह्यायला भाग पाडतो. ‘सहज मिळालं नाही की ओरबाडायचे’ हा पुरुषी ठोकताळा अश्विन मोडू शकतो ते रत्नामुळेच. नात्याचा पाया’ आदर’ असला की ते प्रत्यक्षात सुटूनही अतूट राहतं का? याचं उत्तर तपासायचे असेल तर ‘सर’ नक्की पाहायला हवा.

निर्माते: रोहेना गेरा, ब्राइस पॉइसन

दिग्दर्शन-पटकथा: रोहेना गेरा

कलाकार: विवेक गोम्बर, तिलोतमा शोम, गीतांजली कुलकर्णी, दिव्या सेठ, दिलनाझ इराणी, अनुप्रिया गोएंका आदी


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *