निराशेच्या गर्तेतुन ‘आशावाद’ दाखवणारा सिनेमा: The Shawshank Redemption

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

साधारणपणे ४० चं दशक… ‘अँडी ड्यूफ्रीन’ नावाच्या एका सामान्य बँकरच्या बायकोचे एका गोल्फ प्लेयर सोबत विवाहबाह्य संबंध असतात… मग एकेदिवशी अँडीला ते समजतं… तो तिला जाब विचारतो…त्यावरून त्या दोघांमध्ये बाचाबाची होते…तो रागाच्या भरात तिला काहीतरी बोलतो… जे शेजाऱ्यांनादेखील ऐकू गेलेलं असतं… मग एकेदिवशी तो तिचा पाठलाग करतो.. तिला व तिच्या प्रियकराला मारायचं ठरवतो… तो त्या घरासमोर त्याच्या गाडीत येतो…गाडीमध्ये त्याकाळी व नंतरही गाजलेलं Ink Spot चं ‘If I didn’t care’ हे गाणं चालू असतं… तो पिस्तूल व गोळ्या काढतो… पण नंतर तो विचार बदलतो व तसाच माघारी जातो… जाताना त्याच्याजवळ असलेलं पिस्तूलदेखील नदीत फेकून देतो… दुसऱ्यादिवशी कामवालीला अँडी च्या बायकोचा व तिच्या प्रियकराचा मृतदेह बेडवर दिसतो…

खून दुसऱ्या कुणीतरी केलेला असतो पण त्या दोन खूनांसाठी अँडीला २ जन्मठेपा होतात… त्या भोगण्यासाठी तो ‘Shawshank’ च्या तुरुंगात जातो आणि या पार्श्वभूमीवर ‘स्टीफन किंग’ यांच्या ‘Rita Hayworth and Shawshank Redemption’ या पुस्तकावर बेतलेला ‘Frank Darabont’ यांनी दिग्दर्शित केलेला ‘Tim Robbins’ व ‘Morgan Freeman’ यांच्या ताकदीच्या अभिनयाने संपन्न असा बरच काही शिकवणारा ‘Shawshank Redemption’ हा सिनेमा सुरू होतो.

११ वी १२ वी च्या काळात जेव्हा इंग्लिश सिनेमे इंग्लिश मध्येच बघायची सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळात जे सिनेमे पाहिले गेले त्यात Shawshank होता. खरं सांगायचं झालं तर तेव्हा तो फार कळला नव्हताच; म्हणजे तेव्हा तो भारी वाटला होता त्याच्यातल्या सस्पेन्समुळे… पण बऱ्याच दिवसांनी काल पुन्हा एकदा जेव्हा Shawshank पाहिला तेव्हा मात्र तो मनात पक्का कोरला गेलाय तो त्याने मांडलेल्या फिलॉसफीमुळे! सिनेमाची गोष्ट Shawshank तुरुंगात घडते.

अँडी ( Tim Robbins ) बायकोचा व तिच्या प्रियकराचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगण्यासाठी येतो तो याच Shawshank च्या तुरुंगात! त्या तुरुंगात २० वर्ष तुरुंगवास भोगलेला व तुरुंगात बेकायदेशीरपणे बाहेरून गोष्टी आणण्यात हातखंडा असलेला थोडक्यात तुरुंगातला स्मगलर ‘एलिस रेडिंग’ ( Morgan Freeman ) उर्फ ‘रेड’ नावाचा कैदी त्याचा जवळचा मित्र बनतो. हा रेड या सिनेमाचा narrator आहे. माझ्या दृष्टीने, ‘रेडचा Shawshank च्या कैदेतून मानसिकदृष्ट्या मुक्ततेचा अँडीमुळे झालेला प्रवास’ म्हणजे Shawshank Redemption हा सिनेमा!

‘तुरुंग’ ही जागा जी लोकं समाजासाठी घातक आहेत किंवा ज्यांच्यापासून समाज सुरक्षित नाही अश्या लोकांना उर्वरित समाजापासून वेगळं ठेवण्यासाठी वापरली जाते. अशा लोकाना या जागेत कैद केलं जातं. पण जसा काळ जातो, तसं ते तुरुंग त्या लोकांना ‘मानसिकदृष्ट्या’ देखील कैद करतं. ते तुरुंग त्यांची शिक्षा किंवा कैद न राहता त्यांची व्यवस्था बनतं आणि त्यातील लोक त्या व्यवस्थेचा भाग होतात आणि त्यावरच ते अवलंबून जातात.

पुढे चालून हे कैदी जन्मठेप भोगून शारीरिक दृष्ट्या कैदेतून मुक्त होतीलही पण मानसिकदृष्ट्या मात्र ते त्याच कैदेत राहतात. उर्वरित समाजाचा भाग ते बनूच शकत नाहीत… अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! सिनेमाचा हा विचार तुरुंगात ग्रंथपाल असलेला ५० वर्ष कैद भोगून बाहेर पडणारा ब्रूक्स नावाचा म्हातारा सिनेमात साकारतो. या सर्व प्रक्रियेला रेडने ‘Institutionalised’ होणे म्हटलंय. ज्याला कम्फर्ट झोनची प्रो लेवल म्हणता येईल. मला वाटतं या ‘institutionalised’ होण्याच्या पातळीवर सिनेमा आपल्याला रिलेट होऊ शकतो.

एखादी गोष्ट आपल्याला नकोशी असते. पण तरीदेखील पर्याय नसल्यामुळे म्हणा किंवा नाईलाज म्हणा आपल्याला त्याची सवय होते व कालांतराने आपण त्यावर अवलंबून राहायला लागतो. माझ्या अनुभवानुसार सुरुवातीला मला भ्रष्टाचाराची चीड असायची पण हळूहळू तो स्वीकारून मला त्याची सवय झाली आणि कालांतराने सध्या मी काही पातळ्यांवर भ्रष्टाचारावर अवलंबून आहे. आज भ्रष्टाचारांसारख्या अनेक गोष्टींची, व्यवस्थेची आपल्याला सवय झाली आणि आता कालांतराने आपण त्या व्यवस्थेसाठी व्यवस्थाबद्ध किंवा institutionalise झालोय.

माझ्या निरीक्षणानुसार ज्यांना इतर गोष्टीत जास्त रस आहे पण आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आयटी क्षेत्रात जे लोक नोकरी स्वीकारतात त्यांची त्यांच्या सुरू असलेल्या आयुष्याबद्दल सुरुवातीची ४-५ वर्ष खूप तक्रार असते. त्यांना चालू जॉब सोडून काहीतरी करण्याची भयानक इच्छा असते.

पण नंतर नंतर त्या जॉबची त्यांना सवय होते व कालांतराने ते त्या जॉबवर अवलंबून राहायला लागतात. त्यांना अगोदर ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असायचा तो आता उरत नाही. तो जॉबच त्यांचं आयुष्य बनतं.. तो जॉब त्यांना मानसिकदृष्ट्या कैद करतो… सिनेमातल्या रेडच्या भाषेत सांगायचं तर ती लोकं ‘institutionalised’ होतात.

या ‘Institutionalised’ होण्याला अँडी मात्र सुरुवातीपासून अपवाद आहे. अँडीच्या मते ‘Get busy living or Get busy dying’ हे दोनच पर्याय आपल्यासमोर असतात. जेव्हा Shawshank मध्ये इतर कैदी ‘institutionalised’ झाल्यामुळे दुसऱ्या पर्यायाने जगत असतात तेव्हा अँडी मात्र पहिला पर्याय निवडतो. ज्या गोष्टी Shawshank तुरुंगाच्या इतिहासात कधी घडल्या नाहीत त्या गोष्टी अँडी घडवून आणतो. अख्ख्या Shawshank तुरुंगाची व्यवस्था सांभाळणारा प्रत्येकजण मग तो शिपायापासून जेलच्या प्रमुखापर्यंत पाहिल्यांदाच अँडी नावाच्या कैद्यावर अवलंबून राहायला तो भाग पाडतो.

कायम सुचनाच ऐकू येणाऱ्या जेलच्या भोंग्यामधून प्रथमच तो संगीताचे सुर आणतो… संपूर्ण Shawshank तुरुंग काही क्षणासाठी का होईना त्या तुरुंगाच्या भिंतींच्या कैदेतून मानसिकदृष्ट्या मुक्त होतं… ही संगीताची ताकद… ही काही क्षणाची मुक्तता ते तुरुंग पहिल्यांदाच अनुभवत असतं. हा स्वातंत्र्याचा अनुभव Shawshank या institution मध्ये ‘institutionalised’ झालेल्या प्रत्येकाला त्यातून मानसिकदृष्ट्या मुक्त होण्यासाठी अँडी पहिल्यांदाच आशेचा किरण दाखवतो.

पण ‘institutionalised’ झाल्यामुळे असेल कदाचित रेडचा ‘आशावाद’ किंवा ‘Hope’ या गोष्टीवरचा विश्वासच उडालेला असतो आणि अँडी मात्र त्याच ‘Hope’ नावाच्या गोष्टीमुळे स्वतःला ‘institutionalised’ होण्यापासून त्या Shawshank च्या मानसिक कैदेपासून स्वतला दूर ठेवतो आणि शेवटी याच ‘Hope’ च्या जोरावर तो आपल्या मित्राला म्हणजेच रेडलादेखील Shawshank च्या कैदेतून मानसिकदृष्ट्या मुक्त करतो! सरतेशेवटी अशा ‘Institutionalised’ झालेल्या, Hope विसरलेल्या व ‘Busy dying’ या पर्यायाने जगत असलेल्या प्रत्येकाला ‘Busy living’ हा पर्याय निवडण्याची ‘Hope’ ‘Shawshank Redemption’ हा सिनेमा देतो!

 टीम मेंबर-आनंद कुलकर्णी


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *