Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयगोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार...

गोपीनाथ मुंडेंसोबत एक मिटिंग झाली अन् विनायक मेटे ३० व्या वर्षी आमदार झाले..

आज पहाटे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ते मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असत. मराठा समाजाचे लढवय्ये नेते अशी त्यांची ओळख होती.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मेटेंनी मराठा आरक्षण, ग्रामीण भागातीलल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती या मुद्द्यांवर कायम आवाज उठवला. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले.

सामाजिक चळवळीतून सक्रीय राजकारणात सहभागी झाल्यापासून जवळपास २५ वर्ष मेटेंनी महाराष्ट्र विधानपरिषदेत काम केले. भाजप-राष्ट्रवादी-भाजप असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

मजूर, शिपाई, वेटर, भाजी विक्रेता, पेंटर ते ठेकेदार

केज तालुक्यातील राजगाव या गावात विनायक मेटेंचा जन्म झाला. त्यांचे आई वडील शेती करत. घरची परिस्थिती अत्यंत विदारक असल्याने मेटेंच्या आई वडिलांना १९७२ च्या दुष्काळात रस्त्यांच्या कामावर खडी फोडण्याचे काम करावे लागले. त्यावेळी सुकडी खाऊन मेटे परिवाराने दिवस ढकलले.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मेटेंच्या बहिणीचे लग्न झाले. मात्र, लग्नासाठी जमीन विकावी लागली. तुटपुंजी जमीन विकावी लागल्याने मेटे कुटुंब बेरोजगार झाले. त्यामुळे विनायकरावांना रोजगारासाठी मुंबईला स्थलांतर करावे लागले.

मुंबईला गेल्यानंतर मजूर, शिपाई, वेटर, भाजी विक्रेता अशी कामे त्यांनी केली. कालांतराने मुंबईत बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर मेटेंनी रंग कामाचे ठेकेदार म्हणून आपले बस्तान बसवले.

वेटर म्हणून काम करत असताना वेटरकडे लोकं तुच्छतेने पाहतात, यामुळे मेटेंनी ही नोकरी सोडून दिली होती. कापड मील मध्येही त्यांनी काम केले. पण मील बंद बडताच हजारो मजूर बेरोजगार व्हायचे. असाच अनुभव मेटेंच्याही वाट्याला आला होता.

बेरोजगारीवर पर्याय शोधण्यासाठी मेटेंनी भिवंडी परिसरात पाले भाज्या विकून पोट भरले. डोक्यावर भाजीची टोपली घेऊन ‘भाजी घ्या भाजी’ असे म्हणत त्यांनी भिवंडीत भाजी विकली.

मात्र, इथेही त्यांना यश न आल्यामुळे मेटे कोलमडून गेले होते. यामुळे ते एका झाडाखाली जाऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत. एकांतात जाऊन ते रडले, पण खचले नाहीत. पुढे भाजी विक्री बंद करून त्यांनी पेंटरचे काम सुरु केले. अनेक इमारतींना रंग देत देत मेटेंनी पुढे सुपरवायझर म्हणून काम मिळविले.

दरम्यान, सुपरवायझरचे काम करत असताना त्यांच्या ओळखी वाढल्या. या ओळखीच्या सहाय्याने मेटेंनी रंग कामाची ठेकेदारी सुरु केली.

मराठा महासंघ आणि उभी फुट

पोटासाठी मुंबईत काबाडकष्ट करत असल्यापासूनच विनायक मेटेंनी मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीत पाउल ठेवले होते. त्याकाळी गिरगावात मराठा महासंघाचे कार्यालय होते. या कार्यालयात राहून मेटेंनी संघटनेसाठी काम केले.

संघटनेत प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांना १९९४ मध्ये मराठा महासंघाचे सरचीटणीसपद मिळाले. यामुळे त्यांच्या नेतृत्व गुणांचा अधिक व्यापक स्वरुपात विकास झाला.

त्यातच मराठा व दलित समाजातील अंतर कमी करण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. ठिकठीकाणच्या मराठा व दलित नेत्यांशी चर्चा करून दोन्ही समाजात सलोखा राखण्यासाठी त्यांनी भेटीगाठींचा सिलसिला चालू ठेवला होता.

मराठा व दलित समाजाच्या एकतेसाठी मेटेंनी केलेल्या कामामुळे त्यांच्यावर संघटनेतील काही लोकांनी टीका सुरु केली. मात्र, अंतर्गत विरोधाला न जुमानता त्यांनी कार्य सुरु ठेवले.

मात्र, त्यांच्या एका निर्णयामुळे मराठा महासंघात उभी फुट पडली. तो निर्णय होता, भाजप-शिवसेना युतीला विधानसभा निवडणुकीत पाठींबा देण्याचा.

मराठा महासंघाचे सरचीटणीस ते आमदार

तत्कालीन विरोधी पक्ष नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भेटीनंतर मेटे यांनी युतीला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे संघटनेत विभागणी झाली. मात्र, मुंडे यांच्यासोबत झालेल्या त्या भेटीने मेटेंच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली.

शिवसेना-भाजप युतीचे सरकार येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी विनायक मेटेंना थेट विधानपरिषदेत पाठवले. १९९६ मध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोठ्यातून त्यांना आमदार करण्यात आले. तेव्हा विनायक मेटे केवळ ३० वर्षांचे होते.

मराठा महासंघ ते विधानपरिषद या मेटेंच्या प्रवासात गोपीनाथ मुंडे यांची निर्णायक भूमिका होती. मुंडेंच्या बोटाला धरूनच मेटे राजकारणात आल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

भाजप राष्ट्रवादी ते भाजप

मात्र, विनायक मेटेंचे भाजपसोबत फारकाळ सूर जुळले नाहीत. म्हणून त्यांनी आपली भूमिका बदलत महाराष्ट्र लोकविकास पक्षाची स्थापना करून राष्ट्रवादीशी जवळीक साधली. पुढे मेटेंनी हा पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. नंतर राष्ट्रवादीकडून दोनवेळा ते विधानपरिषदेवर गेले.

राष्ट्रवादीकडून दुसर्यांदा विधानपरिषदेवर असताना मेटे यांनी शिव संग्राम पक्षाची स्थापना केली व २०१४ विनायक मेटे पुन्हा महायुतीचा भाग झाले. त्यानंतर २०१६ मध्ये भाजपने त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली.

सोयीस्कर भूमिकेमुळे चारवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. कसलीही राजकीय पार्श्भूमी नसताना त्यांनी बुद्धी आणि कौशल्याच्या बळावर २४ वर्ष विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळविली.

वरिष्ठांचा सहवास

गोपीनाथ मुंडे यांनी विधानपरिषदेत पाठविल्यानंतर मेटेंचा राज्यातील दिग्गज राजकारण्यांशी संबंध यायला लागला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींपासून शरद पवार ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते.

मेटेंना श्रद्धांजली वाहताना शरद पवार म्हणाले,

विनायक मेटे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमचे सहकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा त्यांनी काम केले. नंतर स्वतःचा पक्ष काढण्याची भूमिका त्यांनी घेतली. अशा एका जीवाभावाच्या सहकाऱ्याला आम्ही मुकलो. ते राजकीय कार्यकर्ते कमी पण सामाजिक कार्यकर्ते अधिक होते.

यावरून मेटेंचे राज्यातील दिग्गज राजकीय नेत्यांशी असलेले संबंध किती घनिष्ट संबंध होते, हे अधोरेखित होते.

अधिक वाचा :

मुंडेंच्या बोटाला धरून रजनी पाटील राजकारणात आल्या…

अटलजी पंतप्रधान होताच गोपीनाथराव साखर कारखानदार झाले…

महाजनांचे वडील म्हणायचे, ‘गोपीनाथ तू प्रमोदच्या नादाला लागू नको, काँग्रेसमध्ये जा’.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments