कोंबड्या अंडी देत नसल्याची पोलिसात तक्रार

पुणे : आपण अनेक तक्रारी ऐकल्या असतील. पण कोंबड्या अंडी देत नाहीत म्हणून कुणी पोलीस ठाण्यात गेल्याचे कधी ऐकले आहात का? कोंबड्या अंडी देत नसल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. हा सर्व प्रकार काय आहे आणि कशामुळे हा प्रकार घडला याचा शोध पोलीस घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोंबड्या अंडी देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथील काही पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांनी मागील आठवड्यापासून अंडी देणे बंद केले. यामुळे तेथील पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी पोल्ट्री चालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार बघून पोलिसांनाही धक्का बसला.
लोणी काळभोर येथील म्हातोबाची आळंदी परिसरातील लक्ष्मण भोंडवे हे पोल्ट्री चालक आहेत. त्यांनी ११ एप्रिल रोजी एका कंपनीकडून कोंबड्याचे खाद्य घेतले. त्यांनी घेतलेले कोंबड्यांचे खाद्य दररोज कोंबड्यांना दिले जात होते. हे खाद्य कोंबड्यांना दिल्यापासून कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले. कोंबडी अंडी का देत नाहीत, हा प्रश्न निर्माण झाला. कोणी अंड्यांची चोरी करीत आहे का, याची शंका येऊ लागली. मात्र, चोरी होत नसल्याचे लक्षात आहे. त्यांनंतर कोंबड्यांची तपासणी करण्याचे ठरले.
त्यानंतर पोल्ट्री व्यवसायिकांनी एका लॅबमध्ये कोंबड्यांची तपासणी केली. त्यामध्ये नव्याने देण्यात येत असलेल्या खाद्यामुळे कोंबडी अंडी देत नसल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे. खातरजमा केल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबधित कंपनीवर कारवाई केली जाईल, अशी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.