कोंढवा भागाला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल

पुणे: समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सोशल मिडीयावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात कोंढव्याला मिनी पाकिस्तान म्हणाल्याचे समोर आले आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने कोंढवा परिसरात हज हाऊस बांधण्यात येत आहे. याला विरोध करतांना मिलिंद एकबोटे यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. त्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या सतिश काळे यांनी तक्रार दिली आहे. तर अजून एक स्थानिक नागरिकाने सुद्धा तक्रार दिली आहे.
कोरेगाव हिंसाचार प्रकरणात मिलिंद एकबोटे जामिनावर आहे. हज हाऊस बांधू नये यासाठी एकबोटे यांनी आपल्या समर्थाकांसह पुणे महापालिकेच्या आयुक्ताची भेट घेतली होती. त्यात त्यांनी हज हाऊस उभारणीला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन दिले होते.
एकबोटे यांचा सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एकबोटे यांनी कोंढवा परिसराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. संभाजी ब्रिगेड आणि स्थानिक मुस्लीम नेत्याने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यावरून दोन गुन्हे दाखल केले आहे.