महेश लोंढे लिखित: निद्रानाशाची रोजनिशी
रोजच्या कोलाहलात रूटीन रिपीट होऊ लागलं की माणूस थिजायला सुरवात होते. सूर्य उगवतो तसा मावळतो. माणूस तसा मावळतो का? त्याला निजायला फक्त काळोख होऊन भागत नाही. ती शांत नीज अलवार येत असते. पण अनेकदा काही कड्या सुटतात आणि निद्रानाश उगवतो. झोप माणसाला टाळू लागते. आणि मग या निद्रानाशाच्या खोल डोहात कवितेची रोजनिशी टंकली जाते. ती प्रातिनिधिक तशीच खूप खूप खासगी सुद्धा. तशी आपल्या सगळ्यांचीच म्हणता येईल. महेश दत्तात्रय लोंढे लिखित ‘निद्रानाशाची रोजनिशी’.
संरक्षक जाळीच्या जीपमधून दूरचा वाघ पाहावा तसे अंतर राखून आयुष्य पहिल्याचे सार्वत्रिक शल्य महेश पूर्णतः नवीन अशा प्रतिमासंचासह मांडतात. आसपासचा निसर्ग ते फार वेगळ्या पद्धतीने पाहतात. नळाच्या जागी नदी, खुर्चीच्या जागी ‘छोटे पठार’ ठेऊ बघतात, त्याने प्रतीमासंकर साधतोच पण एक वाचक म्हणून प्रचंड लोभस कुतूहल चाळवते.
भर दिवसाचे साक्षात्कार मांडताना ते प्रचंड वास्तववादी होतात. ‘न संपणारा उखाणा’, ‘जे सांगून झालंय सगळं’ सारख्या कवितांतून ते वर्तमानाची निरर्थकताच मांडू पाहतात. ती वैयक्तिक ते सार्वत्रिक अशी मोठा पैस असणारी विफलता आहे. संवेदनशीलता हा ‘गुण’ मानावयाचा झाला तर त्यामागून येणारी चीड, हतबलता, दुःख, आततायीपणा हे सगळेच सहन करावे लागणार. ‘दुखऱ्या पानावरून पुढे चालू’ लिहिताना ही सल पचवून महेश रोजनिशीचं पुढचं पान उलगडतात. दुखावून, रक्ताळून पानं उलगडतात. ‘टवटवीत फुलं उमलण्याची’, ‘चंद्राचा तुकडा चोरण्याची’ भाषा बोलू लागतात. ‘जगण्याचा मोसम भरात’ ठेवण्याची आस त्यांना ते बोलायला, लिहायला लावते.
रोजनिशीत निद्रानाश डोकावू लागतो तसा कवितेचा इथल्या रूढ चौकटींशी संबंध तुटू लागतो. अमूर्ततेचा प्रदेश सुरू होतो. कल्पनाही नवी रूपे धारण करू लागतात. रात्रीशी दिवसाला जोडणारा ‘पूल’ ढासळू लागतो. अंधार पापण्यांना ‘डंख’ मारू लागतो. महेश अनेकदा नॉस्टॅल्जिक होतात आणि भूतकाळातले काही नव्याने जोडू पाहतात. फेरमांडणीचा घाट घालतात. आभाळाच्या शोधासाठी खोलवर जाणाऱ्या मुळासारखी ही रोजनिशी वाचताना deja vu अनुभव देते.
जाणिवा विस्तारल्या की कृत्रीम मान्यतांची आवश्यकता भासेनाशी होते. महेश यांचे काहीसे असेच बेफिकीर होणे निद्रानाशात अधिकाधिक बोचरे होत जाते.
‘तरीही त्याचे डोळे
मला दिसत असतात सर्वत्र
आणि मला उमजू लागलेले असतात
अंधारातील आवेग
दिसू लागलेले असतात
सलगीच्या प्रयत्नातील आंधळे मोर’
हे असं काहीसं लिहिताना ते केवळ अमूर्त म्हणून सोडून देता येणार नाही. त्यात एक अतितरल रंग-गंध-स्पर्श जाणीव थरथरते आहे. ती शब्दात पकडताना काहीशी सपाट होते की काय? असे वाटते पण,
संदिग्ध दिवसांतून मी जेव्हा
रात्रीत उतरत राहिलो असंदिग्ध
आतल्या आत काहीसा
उजळत गेलो
हे उजळत जाणं दरवेळी लख्ख आहे. प्रत्येक कविता वाचताना आपण या नाविण्याने सुखावतो. काहीशी इंग्रजी वाक्यरचनेची छाप रचनेवर जाणवते. आणि याची सवय नसल्याने कविताबंध भाषा, रचना, आशय आणि मांडणी या सर्वच पातळ्यांवर वेगळा ठरतो. ‘आपुलाचि वाद आपणासि’ म्हणणाऱ्या तुकोबांशी नाळ जोडत
‘ही निद्रानाशाची रोजनिशी
या अंतहीन रात्री
हे स्वतःशी वाद तुंबळ’
अशा जालीम नोंदी नोंदवत राहते. विराटाला सामोरे जाताना मोरपीस वाऱ्यावर सोडून द्यावं लागणार आहे याची जाणीव देणारे महेश नक्कीच मोठा ‘दमसास’ राखून आहेत.
प्रकाशन: बारलोणी बुक्स