नगरमध्ये बॉम्बस्फोट, दोन जण जखमी, चार किलोमीटरचा परिसर हादरला

अहमदनगर : नगरमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची घटनी घडली असून हा प्रकार नारायणडोह या परिसरात घडला आहे. या बॉम्बस्फोटामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या स्फोटामधील केमिकलचा भडका उडला नाही, त्यामुळे परिसरातील मोठी जीवितहानी टळली आहे. तीन ते चार किलोमीटरपर्यंतचा परिसर या स्फोटाने हादरला. हा प्रकार तालुक्यातील नारायणहोह येथील वस्तीवर रस्त्याचे काम चालू असताना मुरुम टाकताना घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नारायणडोह येथील बाबासाहेब रामराव फुंदे यावस्तीवर जाणाऱ्या रस्त्याचे काम चालू होते. दरम्यान रस्त्यावर मुरुम टाकत असताना त्यामध्ये पीन असणारा जुन्या काळातील बॉम्ब होता. हा बॉम्ब येथील शेतात काम करणाऱ्या महिलेस मिळाला. मंदाबाई फुंदे असे यामहिलेचे नाव असून त्यांनी तो बॉम्ब जवळच शेतात काम करत अरणाऱ्या अक्षय मांडे यांच्याकडे दिला. यावेळी अक्षय याने तो बॉम्ब जमीनीवर आपटला असता त्याच्या मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये अक्षय व मंदाबाई फुंदे हे जखमी झाले आहेत.
बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस सहायक पोलिस निरिक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटना स्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच या परिसरात अजून काही बॉम्ब आहेत का याची पाहणी बॉम्बशोधक पथकाच्या सहाय्याने केली आहे.