देशात लवकरच सुरू होणार ८ नव्या बँका

RBI ने जारी केली नावांची यादी
नवी दिल्ली: देशातील तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग व्यवस्था पोहोचावी यासाठी गेल्या काही वर्षात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासह बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, खासगी कंपन्या यांनाही या क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन दिलं जात आहे. आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुर्गम, ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या कंपन्यांना बँकिंग यंत्रणा उभारण्याची परवानगी देण्याचे धोरण रिझर्व्ह बँकेनं स्वीकारलं आहे. यामुळे अलीकडच्या काळात स्मॉल फायनान्स बँकिंग क्षेत्रात अनेक खासगी कंपन्यांनी प्रवेश केला आहे.
अगदी सूक्ष्म,लघू उद्योगांना कर्ज पुरवठा व्हावा, अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना बँकिंग सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी छोट्या स्वरूपातील बँकांचे जाळे उभारण्यावर भर दिला जात आहे. युनिव्हर्सल बँक या प्रकारा अंतर्गत सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या मोठ्या आकाराच्या बँकांचा समावेश होतो. सध्या युनिव्हर्सल बँक आणि स्मॉल फायनान्स बँक अशा दोन्ही प्रकारातील बँका सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या पुढाकार घेत आहेत.
रिझर्व्ह बँकेनं बँकिंग परवान्यासाठी कधीही अर्ज करण्याची ऑन टॅप नावाची सुविधा सुरू केली असून, यासाठीच्या मार्गदर्शक सूचना १ ऑगस्ट २०१६ आणि ५ डिसेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत नुकतेच बँकेकडे ८ अर्ज दाखल झाले असून, यामध्ये चार अर्ज युनिव्हर्सल बँक प्रकारासाठी तर चार अर्ज स्मॉल फायनान्स बँकेसाठी आहेत.
युएई एक्सचेंज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, द रिपेट्रीएटस कोऑपरेटिव फायनान्स अँड डेव्हलपमेंट बँक लि. (REPCO Bank), चैतन्य इंडियन फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड, पंकज वैश्य आदी कंपन्यांनी युनिव्हर्सल बँकेच्या परवान्यासाठी ऑन टॅप परवाना सुविधेअंतर्गत अर्ज दाखल केले आहेत.